कर्जतच्या राजपूतवाडीत डिजिटल क्रांती; कोरेगाव शाळेत इंटरॅक्टिव्ह पॅनलचे लोकार्पण


कर्जत (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील शिक्षणाला नवे पंख फुटले आहेत. कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील राजपूतवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला सभापती प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज इंटरॅक्टिव्ह पॅनल प्रदान करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे गावातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रक्रियेत मोठी आणि सकारात्मक भर पडणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
आजवर फळा-खडूच्या चौकटीत अडकलेले शिक्षण आता डिजिटल पडद्यावर झळकणार आहे. इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या माध्यमातून शिक्षकांना चित्रफिती, अॅनिमेशन, सादरीकरणे आणि थेट प्रात्यक्षिकांच्या साहाय्याने अध्यापन करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय अधिक समजण्यास सोपा, आकर्षक आणि परिणामकारक होणार आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरांप्रमाणे डिजिटल शिक्षणाची समान संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचा वर्गातील सहभाग वाढणार असून प्रश्नोत्तरांची देवाणघेवाण अधिक गतिमान होणार आहे. शैक्षणिक गुणवत्तेत निश्चितच सुधारणा होईल, असा विश्वास शाळा व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
या डिजिटल भेटीबद्दल ग्रामस्थ, पालकवर्ग तसेच शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी सभापती प्रा. राम शिंदे यांचे मनःपूर्वक आभार मानले. “ग्रामीण मुलांनाही मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि ती साकार करण्याचा अधिकार आहे; आधुनिक साधनांमुळे ही स्वप्ने आता अधिक बळकट होतील,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

गावाच्या शाळेत आलेले हे आधुनिक पॅनल म्हणजे केवळ एक उपकरण नाही, तर बदलत्या काळाची चाहूल आहे. शिक्षणाच्या नव्या वाटा उघडणारा हा उपक्रम राजपूतवाडीच्या भवितव्याला नवे दिशा देणारा ठरणार, यात शंका नाही.




