दादा पाटील महाविद्यालयात बारावी बोर्ड कॉपीमुक्त परीक्षा अभियान.


कर्जत (प्रतिनिधी) :- “होय आम्ही कॉपी करणार नाही आणि कुणाला कॉपी करण्यास प्रवृत्त करणार नाही… असे म्हणत ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी दादा पाटील महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहात नुकतीच बारावी बोर्ड कॉपीमुक्त परीक्षा अभियान अंतर्गत शपथ घेतली. याप्रसंगी येऊ घातलेल्या बारावी बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना व शुभेच्छा देताना प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी “दोन वर्षात विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासाच्या बळावर व दादा पाटील महाविद्यालयात सातत्याने बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने केले जाणारे मार्गदर्शन याच्या आधारे विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन, शास्त्रशुद अभ्यास पद्धती व सूक्ष्म वाचन, चिंतन आणि मनन या त्रिसूत्रीचा वापर करून आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे. दोन वर्षांपासून मिश्र परीक्षा पद्धती व सीसीटीव्हीचा अनिवार्य वापर यामुळे कॉपी करण्याच्या प्रवृत्तीला आळा बसण्यास मदत होत आहे. महाविद्यालयात सातत्याने या पद्धतीचा वापर केल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेविषयी कोणतीही भीती न बाळगता परीक्षेला सामोरे जावे” असे आवाहन केले.

यावेळी बारावी बोर्डाला सामोरे जाणारे कला,वाणिज्य, विज्ञान तसेच एमसीव्हीसी या विविध शाखातील सर्व विद्यार्थी तसेच राम इंगळे, भागवत देशमुख, बाजीराव डहाळे, बापू उद्मले हे पालक देखील उपस्थित होते. पालकांच्या वतीने जयश्री धांडे यांनी मनोगत व्यक्त केले व दादा पाटील महाविद्यालय सातत्याने विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या गुणात्मक विकासासाठी राबवित असलेल्या उपक्रमांविषयी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी त्रिवेणी कानगुडे, सोनम शिंदे, शुभम गवळी, अंजली गुळवे, त्रिवेणी पागिरे या विद्यार्थिनींनी मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान शाखाप्रमुख प्रा. जयदीप खेतमाळीस तर आभार प्रा. प्रवीण घालमे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा.किरण भोसले व प्रा. सुलभा पवार यांनी केले व विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त परीक्षा अभियानाची शपथ प्रा. राजेश दळवी यांनी दिली.




