मिरजगावात रमजाननिमित्त मुस्लिम बांधवांना ड्रायफ्रुट वाटप
डॉ. पंढरीनाथ गोरे व डॉ. शुभांगीताई गोरे यांचा पुढाकार


मिरजगाव (प्रतिनिधी) : सण-उत्सव हे केवळ धार्मिक परंपरांचे प्रतीक नसून समाजातील एकोप्याची नाळ अधिक घट्ट करणारे क्षण असतात. अशाच भावनेतून मिरजगाव येथे रमजान महिन्याचे औचित्य साधत डॉ. पंढरीनाथ गोरे व डॉ. शुभांगीताई गोरे या दाम्पत्याने मुस्लिम बांधवांसाठी ड्रायफ्रुट्स वाटपाचा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिली.
मंगळवारी (दि.१७) ईदच्या पूर्वसंध्येला गावातील मुस्लिम बांधवांना शिरखुर्म्यासाठी लागणारे काजू, बदाम, मनुके, साखर यांसारख्या आवश्यक वस्तूंचे किट देण्यात आले. प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच धार्मिक महत्त्व असलेली ‘जन्नत दरवाजा’ फोटो फ्रेम देत ईदच्या शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

गावातील विविध भागात जाऊन प्रत्यक्ष भेट देत करण्यात आलेल्या या वाटपामुळे मुस्लिम बांधवांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. सणाच्या निमित्ताने सर्व समाजघटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न या उपक्रमातून दिसून आला.
आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत सण-उत्सवांच्या माध्यमातून एकोप्याचा संदेश देणे ही काळाची गरज बनली आहे. अशा वेळी डॉ. गोरे दाम्पत्याने घेतलेला पुढाकार अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

या उपक्रमामुळे मिरजगाव परिसरात बंधुभाव, एकता आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ होण्यास हातभार लागल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. “सण साजरा करताना सर्व समाज घटकांचा सहभाग महत्त्वाचा असतो,” असे मतही काहींनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. पंढरीनाथ गोरे, व डॉ. शुभांगीताई गोरे, अंकुश म्हेत्रे, निवृत्ती जवणे, डॉ. सिमा खेडकर, रमेश घोडके, अभिजीत कांबळे आदींसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



