समाजसेवेचा गौरव! जनजागृती सामाजिक युवा प्रतिष्ठानचे श्री. शरदचंद्र बाजीराव आढाव यांना ‘पुष्पा नथानी पुरस्कार २०२६’ जाहीर


राशीन (प्रतिनिधी) : जावेद काझी.
समाजसेवा ही केवळ एक औपचारिकता नसून माणुसकी जपण्याचा आणि समाजाला काहीतरी परत देण्याचा एक पवित्र संकल्प आहे. या विचारांना प्रत्यक्षात आणत गरजू, वंचित, निराधार व दुर्बल घटकांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या जनजागृती सामाजिक युवा प्रतिष्ठानच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेण्यात आली आहे. या कार्याचा गौरव म्हणून संस्थेचे श्री. शरदचंद्र बाजीराव आढाव यांची ‘पुष्पा नथानी पुरस्कार २०२६ – फॉर एक्सलन्स इन सोशल वर्क’ (For Excellence in Social Work) या प्रतिष्ठित सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. ही राशीन आणि परिसरासाठी अत्यंत अभिमानाची व प्रेरणादायी बाब ठरली आहे.
विविध सेवाकार्यांचा बहुमान
हा पुरस्कार केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून, संस्कार बाल आश्रम, कामधेनु गोशाळा, आजोळ वृद्धाश्रम, मनोरुग्ण आधार केंद्र आणि समाजातील असंख्य गरजूंसाठी अहोरात्र सुरू असलेल्या व्यापक सेवाकार्याची पोहोच पावती आहे. तळागाळातील घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवणाऱ्या या उपक्रमांमुळे परिसरातून आढाव यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कृतज्ञता आणि पुढील संकल्प
या यशामागे ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवला, वेळोवेळी प्रोत्साहन दिले, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केले आणि या खडतर सेवाकार्यात खंबीरपणे साथ दिली, अशा सर्व दानशूर व्यक्ती, सेवाभावी कार्यकर्ते, हितचिंतक व मित्रपरिवाराचे या प्रसंगी मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत.
“माणसासाठी केलेली सेवा हीच खरी ईश्वरसेवा,” या भावनेतून मिळणारा हा सन्मान पुढील सेवाकार्यासाठी अधिक ऊर्जा, वाढीव जबाबदारी आणि अधिक समर्पणाने काम करण्याची नवी प्रेरणा देणारा ठरणार आहे.




