राशीनमध्ये स्मार्ट मीटरविरोधात बसपा आक्रमक; उद्यापासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण!


राशीन (प्रतिनिधी – जावेद काझी):
राशीन ग्रामपंचायतीच्या २७ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत मंजूर झालेल्या स्मार्ट मीटरविरोधी ठरावाची तत्काळ अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी बहुजन समाज पार्टीने (बसपा) आक्रमक भूमिका घेतली आहे. गावात नवीन वीजजोडणीसाठी स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ थांबवावी आणि यापूर्वी बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर काढून घ्यावेत, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांवर प्रशासनाकडून ठोस कार्यवाही न झाल्यास, उद्या, ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे.
ग्रामसभेच्या ठरावानंतरही प्रशासनाचे मौन?
ग्रामसभेच्या ठराव क्रमांक २४/०४ नुसार स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात विषय मांडण्यात आला होता. श्री. वृषभ अनंतसिंग परदेशी यांनी हा विषय मांडला असून, सचिन साळवे यांनी त्याला अनुमोदन दिले होते. चर्चेनंतर हा विषय ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. मात्र, या ठरावानंतर प्रत्यक्षात प्रशासनाकडून कोणती कार्यवाही झाली? याचा लेखी खुलासा ग्रामपंचायतीने करावा, तसेच नवीन वीजजोडणीबाबतचे अधिकृत नियम ग्रामस्थांसमोर स्पष्ट करावेत, अशी मागणी बसपाने लावून धरली आहे. यापूर्वी १२ ऑक्टोबर रोजी दत्तात्रय सोनवणे यांनीही ग्रामसभेच्या ठरावाच्या अनुषंगाने निर्णय घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती.
महावितरणच्या कारभाराविरुद्धही ग्रामस्थांमध्ये रोष
या आंदोलनादरम्यान केवळ स्मार्ट मीटरचा मुद्दा नाही, तर राशीन सब-स्टेशनच्या मनमानी कारभाराविरुद्ध आणि वीज ग्राहकांच्या प्रलंबित तक्रारींवरही आक्रमक भूमिका घेतली जाणार आहे.
सहाय्यक अभियंता शिंदे साहेब कार्यालयात वेळेवर हजर राहत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
वीज बिल व दुरुस्तीसंदर्भातील तक्रारी घेऊन गेलेल्या ग्राहकांना कार्यालयात कुणीच मिळत नसल्याने वारंवार चकरा माराव्या लागतात.
राशीन वीज कार्यालयाचा कारभार अत्यंत निकृष्ट झाला असून, वीज पुरवठा व दुरुस्ती वेळेवर होत नाही.
या सर्व गंभीर समस्यांवर उपोषणादरम्यान ठोस निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी बसपाचे जिल्हा प्रभारी दत्तात्रय सोनवणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.



