शेतकरी संकटात असताना वाढदिवसाचा जल्लोष नको! प्रवीणदादा घुले पाटलांचा संवेदनशील निर्णय; सत्कार-समारंभ टाळण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन


कर्जत, दि. २ : माजी जिल्हा परिषद सदस्य तथा कर्जत तालुक्यातील ज्येष्ठ नेतृत्व प्रवीणदादा घुले पाटील यांचा ३ नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे. या निमित्ताने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांकडून विविध ठिकाणी सत्कार, शुभेच्छा आणि वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन करण्यात येत होते. मात्र, राज्यासह कर्जत-जामखेड परिसरात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट लक्षात घेता वाढदिवसाचा कोणताही जल्लोष किंवा सत्कार समारंभ आयोजित करू नये, अशी भूमिका प्रवीणदादा घुले पाटील यांनी घेतली आहे.
यंदा पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका शेतीला बसला आहे. पावसातील खंड, अपुरा पाऊस आणि पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक भागांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असून पशुधनाच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य शासनानेही दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विविध तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करून उपाययोजना सुरू केल्या आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांचा दुष्काळी उपाययोजनांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
अशा कठीण परिस्थितीत शेतकरी बांधव संकटाचा सामना करत असताना स्वतःचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करणे योग्य नाही, अशी भूमिका घुले पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त हार-तुरे, पुष्पगुच्छ, सत्कार समारंभ, बॅनरबाजी किंवा अनावश्यक खर्च टाळावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
वाढदिवस हा वैयक्तिक आनंदाचा दिवस असला, तरी समाजातील परिस्थितीचे भान ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सध्या शेतकरी बांधवांना आधाराची आणि मदतीची गरज आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा अनावश्यक खर्च टाळून गरजू शेतकरी आणि दुष्काळग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपण्यावर भर देण्याची त्यांची भूमिका आहे.

दरम्यान, प्रवीणदादा घुले पाटील यांच्या या निर्णयाचे कार्यकर्ते आणि समर्थकांकडून स्वागत होत असून वाढदिवसानिमित्त सत्कार करण्याऐवजी सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या निर्णयातून दिला जात आहे. दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा हा प्रयत्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.



