कोट्यवधींचा निधी गेला कुठे? जलजीवनच्या निकृष्ट कामांचा पंचनामा!
ठेकेदार बैठकीला गैरहजर; मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी संतप्त


कर्जत, दि. २९ (प्रतिनिधी) : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी जलजीवन योजना कर्जत तालुक्यात नागरिकांना पाणी देण्याऐवजी ठेकेदारांसाठीच फायदेशीर ठरत असल्याचा आरोप लाभार्थी नागरिकांनी केला आहे. पाच वर्षे उलटूनही अनेक गावांमध्ये योजनेची कामे अपूर्ण, तर काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची असल्याच्या तक्रारींचा पाढाच नागरिकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्यासमोर वाचला. ‘जलजीवन योजना नसून ठेकेदारांसाठी जलसंपत्ती योजना झाली आहे,’ असा संतप्त सवाल उपस्थित करत चुकीची कामे करणाऱ्या ठेकेदारांवर शासकीय पैशाचा अपव्यय केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली.
गुरुवारी कर्जत पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली जलजीवन योजनेची आढावा बैठक पार पडली. यावेळी गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी उपस्थित होते. बैठकीत तालुक्यातील विविध गावांतील लाभार्थी नागरिकांनी योजनेच्या कामांबाबत गंभीर तक्रारी मांडल्या. तब्बल ९८ गावांतील जवळपास ९० टक्के नागरिकांनी कामांच्या दर्जावर आक्षेप घेत शासकीय निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केले.
बैठकीत गावनिहाय कामांचा आढावा घेत असताना प्रत्यक्ष काम करणारे अनेक ठेकेदारच अनुपस्थित असल्याचे समोर आले. कोट्यवधी रुपयांची कामे सुरू असताना ठेकेदार बैठकीला उपस्थित राहत नसल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी नाराजी व्यक्त केली. ठेकेदारांना कामाच्या गांभीर्याची जाणीव नाही का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी संबंधितांना कानपिचक्या दिल्या. कर्जत तालुक्यातील ठेकेदारांच्या अनुपस्थितीचा अनुभव वेगळाच असल्याची टिप्पणीही त्यांनी केली.
जलजीवन योजनेअंतर्गत अनेक गावांमध्ये शासकीय अंदाजपत्रकानुसार पाईप पुरेसा खोलीवर टाकण्यात आले नसल्याच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे पाईप वापरणे, व्हॉल्व्ह, पाण्याच्या टाक्या तसेच आवश्यक यंत्रणा उभारण्यात त्रुटी ठेवणे असे प्रकार झाल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. काही ठिकाणी दुरुस्ती करण्यात आली असली तरी अनेक गावांमध्ये अद्याप समस्या कायम असल्याचे नागरिकांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या ‘हर घर जल’ अभियानांतर्गत कर्जत तालुक्यातील सुमारे ९८ गावांमध्ये जलजीवन योजनेची कामे हाती घेण्यात आली. मात्र पाच वर्षांचा कालावधी उलटूनही अनेक गावांमध्ये योजनेची अपेक्षित अंमलबजावणी झालेली नाही. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत पाणीपुरवठ्यातील अनियमितता आणि योजनेतील त्रुटी अधिक ठळकपणे समोर आल्या आहेत.
नागरिकांनी मांडलेल्या तक्रारी आणि कामांच्या गुणवत्तेबाबत उपस्थित केलेले प्रश्न पाहता जलजीवन योजनेच्या अंमलबजावणीची सखोल तपासणी होण्याची गरज निर्माण झाली आहे. आता मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी या तक्रारींच्या अनुषंगाने काय कारवाई करतात आणि निकृष्ट कामांसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कोणती भूमिका घेतात, याकडे कर्जत तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


