pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

दुरगावच्या विटभट्ट्यांवर ४.५६ कोटींचा दंड; नोटिसा दिल्या, कारवाई मात्र थंडगार!

अनधिकृत खनिज उत्खनन, विज चोरी व पाणी उपशावर प्रश्नचिन्ह; महसूल विभागाच्या भूमिकेवर संशय

Samrudhakarjat
4 6 5 2 2 7

कर्जत (प्रतिनिधी): :- कर्जत तालुक्यातील दुरगाव येथील विटभट्टी व्यवसाय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला असून, महसूल विभागाने तब्बल ६३ विटभट्टी चालकांना ४ कोटी ५६ लाख १ हजार १५२ रुपयांचा दंड ठोठावला आहे. अनधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुकीच्या आरोपांवर ही कारवाई करण्यात आली. मात्र नोटिसा देऊन महिना उलटून गेला तरी पुढील ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

दुरगाव हे विटभट्टी व्यवसायाचे मोठे केंद्र म्हणून ओळखले जाते. अनेक वर्षांपासून येथे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत व्यवसाय सुरू असल्याची चर्चा आहे. येथून कर्जत, राशीन, मिरजगावसह बारामती व पुणे येथे मोठ्या प्रमाणावर विटांची वाहतूक होते. याच पार्श्वभूमीवर माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर महसूल विभागाला हालचाल करावी लागली आणि मंडळ अधिकारी व तलाठ्यांच्या माध्यमातून पंचनामे करण्यात आले.

या पंचनाम्यानुसार ६३ व्यावसायिकांवर मोठा दंड ठोठावून त्यांना तहसील कार्यालयात आपले म्हणणे मांडण्यासाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र अनेकांनी नोटिसांकडे पाठ फिरवली, तर प्रशासनानेही पुढील कठोर पावले उचलण्यास टाळाटाळ केल्याचे दिसून येते. त्यामुळे “कारवाई फक्त कागदावरच?” असा सवाल उपस्थित होत आहे.

दुरगावमधील विटभट्टी व्यवसाय वाढण्यामागे तीन मुख्य कारणे समोर येत आहेत – माती, पाणी आणि विज मोफत मिळणे. व्यवसायासाठी लागणाऱ्या मातीची रॉयल्टी भरली जात नसल्याचा आरोप आहे. पाणीटंचाईच्या काळातही तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला जातो. विजेच्या बाबतीत तर उघडपणे चोरी होत असल्याचे चित्र असून, रात्रीच्या वेळी परिसर औद्योगिक वसाहतीप्रमाणे उजळलेला दिसतो.

या सर्व प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या प्रदूषणामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असून, तक्रारी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

विशेष म्हणजे महसूल विभागाने पंचनामे केले असले तरी, त्यात दाखवलेली माती आणि प्रत्यक्षात वापरली जाणारी माती यामध्ये मोठी तफावत असल्याचेही समोर आले आहे. दुसरीकडे महावितरण विभागाने विज चोरीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असून, अधिकृत कनेक्शनधारक ग्राहकांवर मात्र याचा आर्थिक बोजा पडत आहे.

एकीकडे कोट्यवधींचा दंड ठोठावला जातो, तर दुसरीकडे कारवाई मात्र शून्य — या विरोधाभासी भूमिकेमुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवरच प्रश्न उपस्थित होत आहेत. दुरगावच्या विटभट्टी प्रकरणात “वरदहस्त” आहे का? असा थेट सवाल आता नागरिकांमधून विचारला जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker