राशीन बस स्थानकाचा कायापालट; सफाई कामगार बशीर काझी यांच्या उल्लेखनीय मोहिमेचे प्रवाशांकडून कौतुक!


राशीन (प्रतिनिधी – जावेद काझी): – गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छतेचा अभाव असलेल्या राशीन बस स्थानक परिसराला अखेर नवसंजीवनी मिळाली आहे. बस स्थानक परिसर, प्रवाशांची बैठक व्यवस्था आणि स्वच्छतागृहात वारंवार निर्माण होणारे अस्वच्छतेचे साम्राज्य आणि दुर्गंधी आता इतिहास जमा झाली असून, नवियुक्त सफाई कामगार बशीर काझी यांच्या उल्लेखनीय स्वच्छता मोहिमेमुळे संपूर्ण बस स्थानक चकाचक झाले आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) वतीने नुकतीच, दिनांक १ जुलै २०२६ रोजी अधिकृत पत्राद्वारे राशीन येथील बशीर काझी यांची कंत्राटी पद्धतीने सफाई कामगार पदावर नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीच्या पहिल्या दिवसापासूनच बशीर काझी यांनी आपल्या कर्तव्याची उत्कृष्ट जाण ठेवत बस स्थानकाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे.
स्वच्छता मोहिमेची ठळक वैशिष्ट्ये:
अहोरात्र स्वच्छता: प्रवाशांचे बाकडे (बैठक व्यवस्था), बस स्थानक परिसर आणि कंट्रोल रूमची नियमित व सखोल स्वच्छता केली जात आहे.
आरोग्याची काळजी: दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असलेल्या या भागात कचरा साचू न देता तातडीने विल्हेवाट लावली जात आहे.
जंतुनाशक फवारणी: पावसाळ्याच्या व साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर परिसरात नियमित जंतुनाशक फवारणी करून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यास प्राधान्य दिले जात आहे.

काही दिवसांपूर्वीपर्यंत धुळीच्या आणि दुर्गंधीच्या विळख्यात असलेल्या या बस स्थानकात आता प्रवाशांना शुद्ध हवा आणि स्वच्छ वातावरण मिळत आहे. साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बशीर काझी यांनी घेतलेल्या या विशेष परिश्रमांमुळे राशीन परिसरातील ग्रामस्थ, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. एसटी महामंडळाच्या या योग्य नियुक्तीबद्दलही प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.



