शेगुड गावात कृषिदूतांचे आगमन; शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन


कर्जत (प्रतिनिधी) : सदगुरू कृषी महाविद्यालय, मिरजगाव (ता. कर्जत) येथील ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक संलग्नता उपक्रमांतर्गत अभ्यास दौऱ्यानिमित्त कृषिदूतांचे कर्जत तालुक्यातील शेगुड येथे आगमन झाले. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने कृषिदूतांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
स्वागत समारंभास ग्रामपंचायतीचे सरपंच शांतीलाल (काका) मासाळ, उपसरपंच संदीप (बंडू) शेगडे, ग्रामसेवक गणेश मुकने, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
या अभ्यास दौऱ्यादरम्यान कृषिदूतांनी शेतकऱ्यांना शेतीविषयक विविध बाबींवर मार्गदर्शन केले. हंगामानुसार पीक पद्धती, रासायनिक खतांचा योग्य वापर, कीटकनाशकांची फवारणी करताना घ्यावयाची काळजी, कीटकनाशकांचा सुरक्षित वापर तसेच सेंद्रिय शेतीचे महत्त्व याबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.

आगामी तीन महिन्यांच्या कालावधीत विविध कार्यशाळा व उपक्रमांच्या माध्यमातून कृषिदूत ओम मोहळकर, अभिषेक नाचन, गणेश ठेंग, रितेश नाव्हले, ओंकार वाळके, कैलास राठोड हे शेगुड येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या उपक्रमासाठी श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान, मिरजगावचे संस्थापक डॉ. शंकरशेठ नेवसे, अध्यक्षा कल्याणीताई नेवसे, संचालक सिद्धांत नेवसे, सचिव राजेंद्र गोरे, प्रशासकीय अधिकारी सखाराम राजळे, नोडल अधिकारी अण्णासाहेब रासकर, समन्वयक राहुल मेत्रे, सद्गुरू कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बीटे, कार्यक्रम समन्वयक प्रा. चांगदेव माने, कार्यक्रम अधिकारी प्रा. वैभव शिंदे तसेच विषयतज्ज्ञ प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभणार आहे.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, शेती उत्पादनात सुधारणा व्हावी आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शेगुड गावात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धतींचा लाभ मिळून शेती अधिक फायदेशीर होण्यास मदत होणार आहे.




