कर्जत तालुक्यात भीषण अपघात ; ट्रॅक्टर पाटात पलटी,आई-मुलीचा जागीच मृत्यू!


कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे माहिजळगाव चौक ते वाघमारे रस्त्यावर आज सकाळी सुमारे ११ ते ११.१० वाजण्याच्या दरम्यान ट्रॅक्टर पाटात पडून झालेल्या भीषण अपघातात आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला व तिचे कुटुंबीय मूळचे बीड जिल्ह्यातील असून, ते विहीर खोदकामाचे काम करतात. दरम्यान, माहिजळगाव चौक ते वाघमारे रस्त्यावर ट्रॅक्टर पाटात पडल्याने ही दुर्दैवी घटना घडली.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ व कार्यकर्ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सावंत शेटे, सुमित खेडकर, बाळासाहेब कदम, केशव घोडके यांच्यासह इतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रॅक्टरखाली महिला अडकलेली असल्याने तिला तातडीने बाहेर काढणे आवश्यक होते. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी पाटात उतरून ट्रॅक्टर पलटी केला आणि अडकलेल्या महिलेला बाहेर काढले.

घटनेची माहिती मिरजगाव पोलीस स्टेशनला देण्यात आली. त्यानंतर एपीआय झंजाड व पोलीस कॉन्स्टेबल चंदन दादा घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरजगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे माहिजळगाव परिसरात शोककळा पसरली असून, आई-मुलीच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे…



