दहा वर्षांच्या संघर्षाला यश; तुकाई सिंचन योजनेचा कार्यारंभ!
राम शिंदेंच्या पाठपुराव्याला ऐतिहासिक यश; १९ गावांत जलक्रांतीचा मार्ग मोकळा!


कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील दुष्काळी भागासाठी वरदान ठरणाऱ्या आणि गेल्या दहा वर्षांच्या संघर्षानंतर साकारलेल्या महत्त्वाकांक्षी तुकाई उपसा सिंचन योजनेचा भूमिपूजन व कार्यारंभ सोहळा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते आणि विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. तब्बल ६६ कोटी ८३ लाख रुपये खर्चाच्या या योजनेमुळे कर्जत तालुक्यातील दुष्काळी गावांच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, शेतशिवारात हिरवाई फुलण्याची आशा निर्माण झाली आहे.
या योजनेअंतर्गत कुकडी डाव्या कालव्याचे पाणी उचलून कर्जत तालुक्यातील १९ दुष्काळी गावांमधील २७ जलसाठे भरले जाणार आहेत. त्यामुळे परिसरातील ५९९ हेक्टर शेती क्षेत्र थेट सिंचनाखाली येणार असून, पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. योजनेचे पाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत वेळेत पोहोचावे, यासाठी पाइपलाइनच्या कामात शेतकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी तुकाई उपसा सिंचन योजनेच्या संघर्षमय प्रवासाचा आढावा घेतला. २०१४ मध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली तुकाई चारीची मागणी मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

तत्कालीन जलसंधारण मंत्री असताना विभागाच्या पुनर्रचनेतून सिंचन क्षेत्राची मर्यादा ६०० हेक्टरपर्यंत वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या सुधारित निकषांनुसार मंजुरी मिळालेली तुकाई उपसा सिंचन योजना महाराष्ट्रातील एकमेव योजना असल्याचे प्रा. शिंदे यांनी नमूद केले.
या प्रकल्पासाठी पहिल्या दिवसापासून भक्कम पाठबळ देणारे आणि निधी कमी पडू न देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच तत्कालीन जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे सांगत त्यांनी कर्जतच्या शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानले.

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आपल्या भाषणात तुकाई उपसा सिंचन योजनेसाठी प्रा. राम शिंदे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा आणि प्रयत्नांचा विशेष उल्लेख केला. या योजनेच्या पूर्ततेसाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करत गौरवोद्गार काढले.
जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांचे विशेष आभार
या ऐतिहासिक सोहळ्यास राज्य मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड. कैलास शेवाळे, मधुकर राळेभात, शांतीलाल कोपनर, कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती प्रकाश शिंदे, जामखेड जिल्हा बँक संचालक सचिन घुमरे, भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस स्वप्नील तोरडमल विभागाचे वरिष्ठ अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, पत्रकार, शेतकरी बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून देणारे शिंदे येथील सदाशिव घालमे, श्रीमती ताराबाई घालमे, मोहन घालमे तसेच वालवड येथील दादा राऊत यांचे विशेष आभार मानण्यात आले. या जलक्रांतीसाठी ‘जलदूत’ म्हणून योगदान देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचेही अभिनंदन करण्यात आले.
तुकाई उपसा सिंचन योजनेच्या कार्यारंभामुळे कर्जत तालुक्यातील दुष्काळी भागाच्या विकासाचा नवा अध्याय सुरू झाला असून, शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला आता प्रत्यक्षात पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.



