भरधाव ईर्टिगाची सायकलला जोरदार धडक; दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू


कर्जत : कर्जत तालुक्यातील निंबोडी फाटा येथे शनिवारी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. श्रीगोंद्याहून जामखेडच्या दिशेने जाणाऱ्या ईर्टिगा कारने सायकलवरून जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या अपघातात चैतन्य छगन उदमले (वय १० वर्षे) आणि ओंकार बापू उदमले (वय १२ वर्षे) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. ईर्टिगा कारची धडक इतकी जोरदार होती की दोन्ही मुले गंभीर जखमी झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघातानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी मिरजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. उदमले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून दोन निरागस बालकांच्या अकाली निधनाने निंबोडी फाटा परिसरासह संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.



