व्यापारी संकुल, रमाई घरकुल अन् कुकडीच्या पाण्याचा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांसमोर!
नगराध्यक्ष छायाताई शेलार यांची डॉ. पंकज आशिया यांच्याशी विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा


(कर्जत प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवार, दि. १३ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी कर्जत तहसील कार्यालयाला भेट दिली. यावेळी कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा छायाताई सुनील शेलार यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शहरातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांकडे त्यांचे लक्ष वेधले.
या भेटीदरम्यान कर्जत शहरातील व्यापारी संकुलामध्ये व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी व प्रलंबित प्रश्नांबाबत नगराध्यक्ष छायाताई शेलार यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना सविस्तर माहिती दिली. तसेच रमाई घरकुल योजनेच्या अनुषंगानेही सखोल चर्चा करून योजनेशी संबंधित प्रश्न आणि लाभार्थ्यांच्या अडचणी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
याशिवाय कुकडी प्रकल्पाच्या आगामी रोटेशनमध्ये कर्जत तालुक्यालगत असलेले सर्व बंधारे पाण्याने भरून मिळावेत, अशी महत्त्वपूर्ण मागणीही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. यामुळे परिसरातील पाणीटंचाई कमी होण्यास तसेच शेती व नागरिकांना पाण्याच्या उपलब्धतेबाबत दिलासा मिळण्यास मदत होऊ शकते, अशी भूमिका त्यांनी मांडली.

शहरातील व्यापारी संकुलाचा प्रश्न, रमाई घरकुल योजनेची अंमलबजावणी आणि कुकडीच्या पाण्याचे नियोजन अशा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित महत्त्वाच्या विषयांवर झालेल्या या चर्चेमुळे संबंधित प्रश्न मार्गी लागण्याबाबत नागरिकांचे लक्ष प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीकडे लागले आहे.



