बापूसाहेब देशमुख सोसायटीकडून सभासदांना १५% लाभांश वाटप; दुष्काळाच्या सावटात बळीराजाची दिवाळी झाली ‘गोड’


राशीन : प्रतिनिधी जावेद काझी.
कर्जत तालुक्यातील राशीन येथील नावाजलेल्या बापूसाहेब देशमुख विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने सर्व शेतकरी सभासदांना १५ टक्के लाभांशाचे वाटप करण्यात आले आहे. चालू वर्षी तालुक्यात पडलेल्या दुष्काळामुळे शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता. या पार्श्वभूमीवर तोंडावर आलेला दिवाळीचा सण गोड व्हावा, यासाठी सोसायटीने घेतलेला हा निर्णय सभासदांसाठी मोठा दिलासा देणारा ठरला आहे.
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दुष्काळी परिस्थितीचा विचार करून सर्व सभासदांनी लाभांश देण्याची आग्रही मागणी केली होती. सभासदांच्या या मागणीचा आदर करत सोसायटीचे चेअरमन विक्रमभैया देशमुख यांनी वार्षिक बैठकीमध्ये सर्व सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली होती.
चेअरमन विक्रमभैया देशमुख यांनी केवळ घोषणा न करता या निर्णयाची तात्काळ व प्रभावी अंमलबजावणी केली. दिवाळी सणापूर्वीच सर्व पात्र सभासदांच्या स्वरूपात हाती १५ टक्के लाभांश पोहोचवण्यात आला आहे. ऐन सणासुदीच्या काळात व दुष्काळाच्या सावटात मिळालेला हा लाभांश बळीराजाची दिवाळी आनंदात साजरी करण्यासाठी अतिशय मोलाचा ठरत आहे.
२,७१५ सभासदांना लाभ
सोसायटीच्या या शेतकरीहितैषी निर्णयामुळे राशीन व परिसरातील सर्व सभासदांमधून अत्यंत समाधानाचे वातावरण आहे. ऐन गरजेच्या वेळी खंबीरपणे पाठीशी उभे राहिल्याबद्दल सर्व सभासदांनी चेअरमन विक्रमभैया देशमुख व संचालक मंडळाचे मनापासून आभार मानले आहेत. सोसायटीच्या या उपक्रमाचे संपूर्ण तालुक्यात कौतुक होत आहे. यावर्षी २,७१५ सभासदांना एकूण ३० लाख ५७ हजार ८४८ रुपये एवढ्या मोठ्या रकमेचे सोसायटीच्या माध्यमातून वाटप करण्यात आले आहे.




