साहित्याचा सुगंध दरवळला! ‘अक्षर प्रवाह’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन
स्वाती पाटील यांच्या चार वर्षांच्या साहित्यिक प्रवासाला सलाम; संत गोदड महाराज मंदिरात सामाजिक संघटनांच्या शुभहस्ते प्रकाशन सोहळा


कर्जत (प्रतिनिधी) :- साहित्य, संस्कृती आणि सामाजिक एकतेचा सुंदर संगम साधत कर्जतच्या प्रसिद्ध कवयित्री, लेखिका व संपादिका स्वाती पाटील यांच्या संपादनाखाली प्रकाशित होणाऱ्या ‘अक्षर प्रवाह’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन कर्जतचे ग्रामदैवत श्री संत सद्गुरू गोदड महाराज मंदिर येथे सर्व सामाजिक संघटनांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले.
स्वाती पाटील या गेल्या चार वर्षांपासून ‘अक्षर प्रवाह’ दिवाळी अंकाचे सातत्याने संपादन करत आहेत. महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेरील अनेक लेखक आणि कवींनी या अंकामध्ये आपला साहित्यरूपी सहभाग नोंदवला आहे. विविध विषयांवरील लेख, कविता, वैचारिक लिखाण आणि साहित्यिक रचनांचा या अंकात समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक मान्यवर साहित्यिकांसह नवोदित लेखकांच्या साहित्यालाही या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
यावेळी प्रा. विशाल म्हेत्रे, अनिल तोरडमल आणि दिवाळी अंकाच्या संपादिका स्वाती पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. साहित्यनिर्मिती, वाचनसंस्कृती आणि नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्व यावेळी आपल्या भाषणातून अधोरेखित करण्यात आले.

विशेष म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपासून कर्जत शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सातत्याने श्रमदान करणाऱ्या तसेच पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या सर्व सामाजिक संघटनांच्या शुभहस्ते या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. सामाजिक कार्य करणाऱ्या हातांना साहित्यपीठावर सन्मान देणारा हा उपक्रम यावेळी विशेष लक्षवेधी ठरला.

या प्रकाशन सोहळ्यास सर्व सामाजिक संघटनांचे शिलेदार, साहित्यप्रेमी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. साहित्याचा विचार आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम घडविणारा ‘अक्षर प्रवाह’चा हा उपक्रम कर्जतच्या सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठरत आहे.




