कर्जत तालुक्यात पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक; राशीनचा वीजप्रश्नही मार्गी!
पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड अन् महावितरणचे उपअभियंता रघुनाथ शिंदे यांच्या कार्याचे सामाजिक कार्यकर्ते संभाजी (दादा) लोंढे यांच्याकडून कौतुक!


कर्जत (प्रतिनिधी) : – कर्जत तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रभावी उपाययोजना आणि राशीन गावातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणने घेतलेली तत्पर भूमिका यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड आणि महावितरणचे राशीन येथील उपअभियंता रघुनाथ शिंदे यांनी आपल्या कर्तव्यदक्षतेतून नागरिकांना दिलासा दिला आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सामाजिक कार्यकर्ते संभाजी (दादा)लोंढे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
कर्जत तालुक्यात यापूर्वी चोरीच्या व गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर रात्रीची गस्त वाढविणे, गुन्हेगारांवर लक्ष ठेवणे आणि अवैध धंद्यांविरोधात कारवाई करणे यावर विशेष भर दिला. त्यांच्या नियोजनबद्ध कामकाजामुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.

राशीन येथील श्री जगदंबा देवीच्या दसरा उत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिक गावात दाखल होतात. अशा गर्दीच्या काळात वीजपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी महावितरणचे उपअभियंता रघुनाथ शिंदे यांनी विशेष दक्षता घेतली. वीजवाहिन्यांची दुरुस्ती, रोहित्रांची देखभाल तसेच तांत्रिक अडचणींचे तातडीने निराकरण करून त्यांनी नागरिकांची आणि भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न केले.
प्रशासकीय अधिकारी हे केवळ पदावर नसून जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असतात. नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या तत्परतेने सोडविणारे अधिकारी समाजासाठी प्रेरणादायी ठरतात, असे मत सामाजिक कार्यकर्ते संभाजी लोंढे यांनी व्यक्त केले.
पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांची कायदा-सुव्यवस्था राखण्यातील कर्तव्यदक्षता आणि उपअभियंता रघुनाथ शिंदे यांची वीजसमस्या सोडविण्यातील तत्परता निश्चितच कौतुकास्पद आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांचे राशीन ग्रामस्थांच्या वतीने आभार मानत संभाजी (दादा) लोंढे यांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



