कर्जत शहर उद्या कडकडीत बंद! रमाई आवास घरकुल लाभार्थ्यांचा न्यायासाठी एल्गार


कर्जत (प्रतिनिधी) : रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांना न्याय मिळावा, त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जावे, यासाठी रमाई आवास घरकुल लाभार्थी संघर्ष समितीच्या वतीने शनिवारी, दि. २१ नोव्हेंबर २०२६ रोजी कर्जत शहर कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रमाई आवास घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना न्याय मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली असून, आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. प्रशासनाच्या विरोधात एल्गार पुकारत लाभार्थ्यांनी एकजुटीने संघर्षात सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

‘हा लढा आपल्या हक्कासाठी आहे, असा नारा देत लाभार्थ्यांनी एकत्र येऊन संघर्ष करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रमाई आवास घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका संघर्ष समितीने मांडली आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी कर्जत शहर कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले असून, या आंदोलनाकडे संपूर्ण कर्जत तालुक्याचे लक्ष लागले आहे.



