कर्जत शहर उद्या कडकडीत बंद! रमाई आवास घरकुल लाभार्थ्यांचा न्यायासाठी एल्गार


कर्जत (प्रतिनिधी) : रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता नगरपंचायत कर्जतकडून मिळत नसल्याने भीमसैनिकांसह लाभार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या मागणीसाठी सोमवार, दि. १६ नोव्हेंबर २०२६ पासून कर्जत येथील प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू असून, पाच दिवस उलटूनही प्रशासनाकडून ठोस निर्णय घेण्यात आलेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे यांनी शनिवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी कर्जत शहर कडकडीत बंद ठेवण्याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता मिळत नसल्यामुळे भीमसैनिक अनिल समुद्र, संतोष आखाडे, विजय साळवे व सार्थक भैलुमे हे सोमवारपासून प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र, पाच दिवसांपासून उपोषण सुरू असतानाही नगरपंचायत कर्जत व शासनाच्या माध्यमातून याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला जात नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

उपोषणकर्त्यांची प्रकृती गंभीर बनत चालली असून, त्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने उपोषणकर्त्यांच्या शारीरिक स्थितीचा विचार करून त्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात आणि उपोषण मागे घेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
अन्यथा शनिवार, दि. २१ नोव्हेंबर २०२६ रोजी कर्जत शहर कडकडीत बंद ठेवण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, तहसीलदार, नगरपंचायत मुख्याधिकारी आणि कर्जत पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.



