लेंडी बंधाऱ्यात कुकडीचे पाणी सोडा! – युवासेना तालुकाप्रमुख सोमनाथ शिंदे
युवासेना तालुकाप्रमुख सोमनाथ शिंदे यांची पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी


कर्जत (प्रतिनिधी) : पाण्याअभावी बळिराजा हवालदिल झाला असून, रब्बी हंगामातील मोजक्या पेरणी झालेल्या पिकांनाही आता पाण्याची नितांत गरज भासू लागली आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत शहरालगत असलेल्या लेंडी नदीवरील बंधाऱ्यात कुकडीचे पाणी तातडीने सोडण्यात यावे, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) युवासेनेचे तालुकाप्रमुख सोमनाथ शिंदे यांनी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कर्जत तालुक्यात यंदा अपुऱ्या पावसामुळे रब्बी हंगामातील पेरण्या अत्यंत कमी प्रमाणात झाल्या आहेत. पेरणी झालेली मोजकी पिके वाचवण्यासाठी शेतकरी मोठ्या धडपडीने प्रयत्न करत आहेत. मात्र, पाण्याची उपलब्धता नसल्याने पिके वाळण्याच्या मार्गावर असून, शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे.

कर्जत शहरालगत असलेला लेंडी नदीवरील बंधारा हा शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या बंधाऱ्यात कुकडीचे पाणी सोडल्यास परिसरातील कूपनलिका, विहिरी आणि हातपंपांचे पुनर्भरण होण्यास मदत होईल. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या तसेच दैनंदिन वापराच्या पाण्याचा मोठा दिलासा मिळू शकतो. याशिवाय, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्नही काही प्रमाणात मार्गी लागण्याची शक्यता आहे.
लेंडी नदीवरील बंधारा कुकडीच्या पाण्याने भरल्यास परिसरातील शेती आणि नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे. बंधाऱ्यात पाणी सोडण्यासाठी परिसरातील शेतकरी पाटबंधारे विभागाची नियमानुसार पाणीपट्टी भरण्यास तयार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांची पिके वाचवणे, नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा दिलासा देणे आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडवणे या दृष्टीने लेंडी बंधाऱ्यात तातडीने कुकडीचे पाणी सोडण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित विभागाला त्वरित पाणी सोडण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी सोमनाथ शिंदे यांनी केली आहे.



