राशीन येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची दुष्काळ आढावा बैठक संपन्न


राशीन (प्रतिनिधी – जावेद काझी) : तालुक्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर बनली असून, या संकटाच्या काळात शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. दुष्काळ जाहीर होऊनही शेतकऱ्यांकडे सक्तीची कर्जवसुली करणाऱ्या फायनान्स कंपन्यांचा चोख बंदोबस्त करू, असा सज्जड इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहर प्रमुख जितेंद्र स्वामी शेटे यांनी दिला.
राशीन येथे पक्षाच्या वतीने दुष्काळी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस विधानसभा प्रमुख सुभाष जाधव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गावातील आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर सखोल चर्चा करून प्रशासनाला जाब विचारण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीतील प्रमुख चर्चेचे मुद्दे :
पाणी व चारा टंचाई : राशीन गाव आणि परिसरातील विहिरी व बोअरवेलची पाणी पातळी कमालीची खालावली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची सद्यस्थिती काय आहे, तसेच जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची गरज व शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याचा आढावा घेण्यात आला.
पीक नुकसान व विमा : दुष्काळामुळे वाया गेलेली पिके, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या आणि अद्याप न मिळालेला पीक विमा व नुकसान भरपाई यावर चिंता व्यक्त करण्यात आली.

कर्जवसुली व वीज कपात : दुष्काळ जाहीर होऊनही फायनान्स कंपन्यांकडून सुरू असलेली सक्तीची वसुली त्वरित थांबवण्याबाबत ठाम भूमिका घेण्यात आली. तसेच वीज बिल सवलत, पीक कर्ज आणि सुरू असलेल्या अघोषित वीज कपातीवर चर्चा झाली.
मजुरांचे स्थलांतर : हाताला काम नसल्याने मजुरांचे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे तातडीने सुरू करण्यावर भर देण्यात आला.
पुढील आंदोलनाची दिशा :
राशीन परिसर तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करणे, टँकरची संख्या वाढवणे, चारा छावण्या सुरू करणे आणि पीक विमा त्वरित मंजूर करणे या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात येणार आहे. यापुढे पदाधिकारी गावागावात जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतील आणि प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या बैठकीत देण्यात आला.

या बैठकीस विधानसभा प्रमुख सुभाष जाधव, शहर प्रमुख जितेंद्र स्वामी शेटे, उपशहर प्रमुख संदीप राऊत, उपशहर प्रमुख साहिल शेख, शाखाप्रमुख बाळासाहेब शेटे, अमोल दळवी, सुनीलकाका दगडळ, सागर पगी यांच्यासह शिवसैनिक विलास रेणुकर, ॲड. विकी साळवे, रमेश परदेशी, राजेंद्र मुसळे, भारत गेहलोत आदी उपस्थित होते. शिवसेनेची ही आढावा बैठक गुरुवार दि.२६/११/२६. रोजी रात्री आठ वाजता कर्जत राशीन रोडवरील हॉटेल अंबर व्हेज येथे संपन्न झाली.



