राशीन येथे ७७ वा संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा; संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन


राशीन (प्रतिनिधी – जावेद काझी) : येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय येथे ७७ वा ‘संविधान दिन’ गुरुवार (दि. २६ नोव्हेंबर २०२६) रोजी सायंकाळी अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी संविधानाच्या उद्देशिकेचे सार्वजनिक वाचन करून संविधानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात राशीन येथील आंबेडकर चौक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर वाचनालयात झालेल्या कार्यक्रमात भीम अनुयायी, भीमसैनिक तसेच भीमनगर येथील समाज मंदिराच्या परिसरातील बच्चे कंपनी मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.
या प्रसंगी अंकुश साळवे (जिल्हा उपाध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी, अहिल्यानगर दक्षिण), मुकुंद आढाव (खजिनदार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, राशीन), ॲड. आकाश साळवे, सामाजिक कार्यकर्ते हरी साळवे, बौद्धाचार्य पोपट साळवे, ॲड. स्वप्निल ऊर्फ विकी रामकिसन साळवे, रुद्रदादा राऊत (शहराध्यक्ष, युवक क्रांती दल, राशीन) आणि सामाजिक कार्यकर्ते अमर साळवे यांच्यासह अनेक मान्यवर व लहान मुले उपस्थित होती.

संविधानिक मूल्यांची जपणूक आणि नव्या पिढीमध्ये संविधानाची ओळख रुजवण्याचा संकल्प या वेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.




