राशीनमध्ये स्व. रावसाहेब देशमुख यांच्या २२ व्या पुण्यस्मरणानिमित्त ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांचे प्रवचन संपन्न.


राशीन प्रतिनिधी जावेद काझी :- राशीन स्वर्गीय रावसाहेब देशमुख यांनी आयुष्यभर सामाजिक बांधिलकी जपत निस्वार्थपणे समाजाची सेवा केली. त्यांनी गावातील तंटे गावातच मिटवले, मुलींच्या शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्न केले तसेच पती-पत्नीचे वाद मिटवून अनेक संसार उभे केले, असे प्रतिपादन ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांनी केले.
येथील रावसाहेब देशमुख नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने स्वर्गीय रावसाहेब देशमुख यांच्या २२ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित प्रवचन सोहळ्यात ते बोलत होते.
जात-पात किंवा धर्मभेद न मानता स्वर्गीय देशमुख हे गावातील गोरगरिबांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असत. त्यांच्या या समाजोपयोगी कार्यामुळेच आज २२ वर्षांनंतरही त्यांचे पुण्यस्मरण मोठ्या आदराने साजरे केले जात आहे, असेही पठाडे महाराज यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ह.भ.प. भाऊसाहेब काळे महाराज म्हणाले की, “कर्तबगार आणि समाजहितासाठी झटणाऱ्या माणसाची पुण्यतिथी नेहमीच प्रेरणादायी ठरते. स्वर्गीय देशमुख यांच्या विचारांचा वारसा समाजोपयोगी असून, तो सर्वांनीच अंगीकारला पाहिजे.”
स्वर्गीय रावसाहेब देशमुख यांनी तब्बल ४० वर्षे राशीन गावचे सरपंचपद भूषविले. या प्रदीर्घ काळात त्यांनी गावातील नागरिकांचा विश्वास संपादन केला. सामाजिक कार्याचा वसा घेत गावच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाकांक्षी व दैनंदिन जीवनातील मूलभूत प्रश्न मार्गी लावून त्यांनी राशीनमध्ये आपली एक वेगळी ख्याती निर्माण केली.
या सोहळ्याला रावसाहेब देशमुख नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तुकाराम सागडे, व्हाईस चेअरमन विलास तोरडमल, माजी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब कानगुडे, संचालक दिलीप आच्छा, सदाशिव मासाळ, जनार्दन मोढळे, शरद शेटे, भीमराव काळे, निवृत्त डीवायएसपी ईश्वर आंधळकर, वैभव काळे, सय्यद एस. एस., विजयकुमार साळवे, सुभाष फराटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर दंडे यांनी केले, तर सूत्रसंचालन पतसंस्थेचे सीईओ एम. के. कानगुडे यांनी केले.


