जगदंबा विद्यालयात ७७ वा ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा; उद्देशिकेचे सामूहिक वाचन


राशीन (प्रतिनिधी – जावेद काझी) :
रयत शिक्षण संस्थेच राशिन तालुका कर्जत येथील श्री जगदंबा विद्यालयात ७७ वा ‘संविधान दिन’ मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले तसेच संविधानाच्या मूल्यांची जपणूक करण्याचा संकल्प करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात राशीन येथील आंबेडकर चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. या वेळी ॲड. सुरेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व, मूलभूत हक्क व कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन केले आणि संविधान शिल्पकारांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

नव्या पिढीमध्ये, विशेषतः शालेय विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची ओळख व लोकशाही मूल्यांची जाणीव रुजवण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याला व आठवणींना उजाळा देण्यात आला.
या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश उडाने, उपप्राचार्य संग्राम राक्षे, पर्यवेक्षक शिवाजी बाबर, प्राध्यापक शरद पवार, ॲड. विकी साळवे, यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगताप सर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार बी. एस. पवार सर यांनी मानले.




