बिभीषण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करपडी येथे रास्ता रोको
लेखी आश्वासनानंतर रास्ता रोको मागे मात्र प्रलंबित मागण्यासंदर्भात आंदोलन सुरूच..


राशीन (प्रतिनिधी – जावेद काझी) : – कर्जत तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा दिवसाआड केवळ सहा तास करण्यात आल्याच्या निषेधार्थ, तसेच परिसरातील रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात शेतकरी व ग्रामस्थांनी आज (शनिवार, दि. २८) सकाळी अकराच्या सुमारास करपडी फाटा येथे जोरदार रास्ता रोको आंदोलन केले. शिवसेनेचे तालुकाध्यक्ष बिभीषण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिंपोरे, बाभूळगाव दु., मानेवाडी, करपडी, वैदान आणि आद्योती येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.
महावितरणकडून २७ नोव्हेंबरपासून शेतीपंपांना दिवसाआड सहा तास वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नदीकाठच्या शेतांमध्ये सध्या कांदा, केळी, पेरू यांसह विविध पिके उभी असून, त्यांची काढणी मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. ऐन हंगामात वीजपुरवठा कमी केल्याने पिकांना पाणी देणे कठीण झाले असून, शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा खर्च पाण्यात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बियाणे, खते, औषधे, मशागत आणि मजुरीवर मोठा खर्च केल्यानंतर वीजकपात करणे अन्यायकारक असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त करत ‘आधी पिके जगवा, मग वीजकपात करा,’ अशी मागणी लावून धरली. शेतीपंपांना दररोज आठ तास वीजपुरवठा पूर्ववत करावा, असा आग्रह आंदोलकांनी धरला.

ऊस वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर
करपडी फाटा ते बाभूळगाव दु. या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. शेजारील सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यासह परिसरातून या मार्गावरून मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक होते. खराब रस्त्यावरून सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे अपघातांचा धोका वाढला असून, शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावावे आणि धोकादायक अवजड वाहतुकीवर नियंत्रण आणावे, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली.
प्रत्यक्ष कृतीची प्रतीक्षा
आंदोलनाची दखल घेत महावितरण व संबंधित विभागांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनी आपल्या मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, केवळ कागदोपत्री आश्वासने न देता प्रत्यक्ष कार्यवाही करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

आंदोलनात सरपंच निवृत्ती कानगुडे, उपसरपंच जालिंदर काळे, भाजप तालुकाध्यक्ष सुनील काळे, माऊली सायकल, नितीन पाटील, धनंजय मोरे पाटील, आजिनाथ शेटे, कैलास शिंदे, अजित कानगुडे, तुषार गायकवाड, रोहन काळे, तानाजी काळे, बाळासाहेब माने, सत्यवान काळे, अमोल गायकवाड, गोरख कावळे, येताळा शेजाळ, नंदू माळवदकर, रामभाऊ माळवदकर यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्ता रोको संदर्भात काही मागण्या संबंधित अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन मिळाले असल्यामुळे रास्ता रोको मागे घेण्यात आला. परंतु काही रोहित राहिलेल्या मागण्या पूर्ण झाल्यामुळे धरणे आंदोलन करपडी बाभळगाव मार्गावर सुरू राहणार असल्याची माहिती बिभीषण गायकवाड यांनी दिली



