आषाढी एकादशीला संत सेना महाराज मंदिर भक्तिरसाने न्हाऊन निघाले; भजन, महाप्रसादासह गुणवंतांचा गौरव
पीएचडी प्राप्त डॉ. श्रुती शहा व १९ वर्षांपासून अनाथ विद्यार्थ्यांना महाप्रसाद देणारे विश्वनाथराव काशीद यांचा नाभिक समाज संघटनेतर्फे सन्मान


कर्जत | प्रतिनिधी :- आषाढी एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर कर्जत शहरातील नाव्ही गल्ली येथील संत शिरोमणी श्री सेना महाराज मंदिरात भक्तिमय वातावरणात भजन, महाप्रसाद वितरण आणि सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. मुक्ताई महिला भजनी मंडळ, शहाजीनगर यांनी सादर केलेल्या सुरेल भजनांनी मंदिर परिसर भक्तिरसाने भारावून गेला.

या कार्यक्रमात कर्जत शहरातील सद्गुरू श्री गोदड महाराज तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रसाद (भैय्या) शहा यांच्या कन्या डॉ. श्रुती शहा यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएचडी पदवी प्राप्त केल्याबद्दल नाभिक समाज संघटनेच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या यशाबद्दल उपस्थितांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच गेल्या १९ वर्षांपासून आषाढी एकादशीच्या निमित्ताने कर्जत येथील स्नेहप्रेम अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना आपल्या घरी खिचडीचा महाप्रसाद देण्याची सेवा अखंडपणे करणारे विश्वनाथराव काशीद यांच्या सामाजिक कार्याचाही नाभिक समाज संघटनेतर्फे विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी नाभिक समाज संघटनेचे युवक अध्यक्ष नामदेव थोरात यांनी आषाढी एकादशीच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देत, “डॉ. श्रुती शहा यांनी समाजाचे नाव उंचावले असून त्यांच्या यशाचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा,” असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास नामदेव थोरात, यशवंत थोरात, संतोष थोरात, अनिल थोरात, बाळासाहेब थोरात, प्रताप थोरात, संजय राऊत, सुनील भोज, गोविंद थोरात, छोटू थोरात, भीमराव थोरात, किरण काशीद, नंदकिशोर थोरात, योगेश थोरात, ओंकार थोरात, अनिकेत थोरात, शिवम थोरात, ओम जाधव तसेच सुषमाताई थोरात, शोभा शेळके, अश्विनी थोरात, शितल थोरात, वर्षा थोरात, लता थोरात, मनीषा थोरात, प्रतीक्षा शेळके, उमा थोरात, साधना थोरात आदी उपस्थित होते.




