राशीन येथे डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या अस्थिकलश दर्शनाप्रसंगी भावपूर्ण अभिवादन सभा संपन्न.


राशीन प्रतिनिधी जावेद काझी. :- शंकरचार्यांशी वादविवाद जिंकणारे अन् ‘जाणवे तोडा, माणसे जोडा’ असा पुरोगामी विचार देणारे विद्रोही नेतृत्व: वक्त्यांचे प्रतिपादन
“डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सामाजिक चळवळींच्या माध्यमातून जातमुक्त आणि वर्गहीन समाज निर्माण करण्यासाठी आयुष्यभर कृतिशील प्रयत्न केले. १९८० च्या दशकात त्यांनी कणखर भूमिका घेत हुंडाविरोधी चळवळ रुजवली. स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करणारे ते खऱ्या अर्थाने स्त्रीवादी नेते होते,” असे गौरवोद्गार युक्रांदच्या ज्येष्ठ नेत्या सुशीला मोराळे यांनी काढले.

राशीन येथे आयोजित दिवंगत डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या अस्थिकलश दर्शन व भावपूर्ण अभिवादन सभेत प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
आपल्या भाषणात मोराळे पुढे म्हणाल्या, “डॉ. सप्तर्षी यांच्या सहवासामुळे आणि विचारांमुळेच आम्हाला समाजवाद, मार्क्सवाद, सरंजामशाही आणि जातीयवाद यातील फरक समजला. मराठवाड्याच्या सिंचनाचा अनुशेष त्यांनीच पहिल्यांदा अधोरेखित केला. १९७४ मध्ये पुरीच्या तत्कालीन शंकराचार्यांना थेट आव्हान देऊन वादविवादात पराभूत करणारा हा विद्रोही अन् पुरोगामी नेता होता. ‘जाणवे तोडा आणि माणसे जोडा’ हा विचार देत त्यांनी माणसाच्या जगण्याला आणि त्याच्या अस्तित्वाला नेहमी प्राधान्य दिले.”

कर्जत-राशीनच्या राजकारणाला दिली नवसंजीवनी
यावेळी विचार मांडताना माजी सरपंच शिवदास शेटे म्हणाले की, “८० च्या दशकात कर्जत तालुक्यात विरोधी पक्ष जिवंत ठेवण्याचे आणि तिथल्या राजकारणाला कलाटणी देण्याचे ऐतिहासिक काम डॉ. सप्तर्षी यांनी केले. बबनराव पाचपुते आणि बबनराव ढाकणे यांसारख्या नेत्यांना त्यांनीच राजकारणात मार्गदर्शन केले. राजकीय मतभेद असोत वा संघर्ष, त्यांनी कधीही द्वेषाचे राजकारण केले नाही.”
चळवळीतील सहकाऱ्यांकडून आठवणींना उजाळा
सभेत प्रकाश बजाज, रामचंद्र साळवे, अल्लाउद्दीन काझी, मालोजी भिताडे, रवींद्र साळवे, आप्पा अनारसे, विठ्ठल काळे, सुभाष जाधव, तात्या माने, गणेश कदम, किरण पोटफोडे, पोपट शेटे, शरद शेटे, राहुल ढवाण आणि कमलाकर शेटे आदी मान्यवरांनी डॉ. सप्तर्षी यांच्यासोबतच्या चळवळीतील आठवणींना उजाळा दिला.
या कार्यक्रमास युक्रांदचे ज्येष्ठ नेते प्रवीण सप्तर्षी, अविनाश दोशी, माजी सरपंच अल्लाउद्दीन काझी, दत्ता गोसावी, ज्ञानदेव काळे, दिलीप थोरात, शेखर सुरवसे, अतुल शहा, दिलीप नष्टे, ऍड. युवराज राजेभोसले, नवनाथ जांभळकर, मकरंद सप्तर्षी, मनोज बोरा यांच्यासह राशीन व परिसरातील ग्रामस्थ आणि पुरोगामी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


