जुनी नगरपंचायत रोडवरील व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर
नगरपंचायत कॉम्प्लेक्समध्ये प्राधान्याने गाळे देण्याची मागणी; मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना निवेदन

कर्जत : जुनी नगरपंचायत रोडवरील गेल्या २० ते २५ वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या गाळेधारक व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नगरपंचायत कॉम्प्लेक्समध्ये प्राधान्यक्रमाने गाळे देऊन व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी करीत गाळेधारकांनी मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्षा छाया सुनील शेलार यांना निवेदन दिले.

गेल्या २० ते २५ वर्षापासून याच ठिकाणी व्यवसाय करून अनेक व्यापारी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. कोरोना काळ, मुलांचे शिक्षण, नगरपंचायतीचे भाडे, वीजबिले आणि विविध आर्थिक अडचणींचा सामना करूनही त्यांनी व्यवसाय सुरू ठेवला. त्यामुळे सध्याच्या जागेवरून स्थलांतर झाल्यास कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी निवेदनातून स्पष्ट केले.

नगरपंचायतीचे भाडे नियमितपणे भरत असून, नगरपंचायतीच्या नियमानुसार मासिक अथवा वार्षिक भाडे भरण्यास व्यापारी तयार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कॉम्प्लेक्समध्ये गाळे मिळाल्यास सध्याचे अतिक्रमण स्वतःहून काढण्याची तयारी व्यापाऱ्यांनी दर्शविली आहे.
यापूर्वीही मुख्याधिकारी व नगरपंचायतीकडे दोन ते तीन वेळा निवेदने देण्यात आली असून, त्याच्या पोहोच पावत्या व्यापाऱ्यांकडे आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांचे व्यवसाय विस्थापित होण्यापासून वाचवून प्राधान्याने पुनर्वसन करावे, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी कांतीलाल तोरडमल, हनुमंत भोगे, प्रवीण गाडेकर, प्रितम गाडेकर, रमेश तापकीर, सोमनाथ पठाडे, कृष्णा कामठे, माऊली नलवडे, दादासाहेब ननवरे, मल्हारी राऊत,विनायक साळुंखे, राजेश ससाने आदी व्यापारी उपस्थित होते.
“व्यापाऱ्यांचा प्रश्न केवळ गाळ्यांचा नसून त्यांच्या उदरनिर्वाहाचा आहे. त्यांचे नुकसान होणार नाही, अशा पद्धतीने योग्य मार्ग काढू.” – नगराध्यक्षा छाया सुनील शेलार




