विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर काळजीपूर्वक करावा : पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड


(कर्जत प्रतिनिधी) : मोबाईल हा आजच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, त्याचा अतिरेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर तसेच मानसिक व सामाजिक जीवनावर परिणाम करू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईल व सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक आणि गरजेपुरताच करावा, असे आवाहन कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी केले.
निमगाव डाकू येथील श्री धाकोजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात किशोरवयीन मुला-मुलींमध्ये मोबाईल व सोशल मीडियाचा वाढता वापर या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक गायकवाड बोलत होते.

यावेळी बोलताना गायकवाड यांनी सांगितले की, अन्न, वस्त्र आणि निवारा यांसोबत मोबाईलही आज आवश्यक वाटू लागला आहे. मात्र विज्ञानाने निर्माण केलेली साधने फायद्याची ठरण्याऐवजी त्यांचा अयोग्य व अतिवापर झाल्यास मोठे नुकसान होऊ शकते. विशेषतः शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या वापरावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वकर्मा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा कर्जत नगरपंचायतीचे नगरसेवक प्रसादजी ढोकरीकर होते. कार्यक्रमात आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत बक्षीस मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी निमगाव डाकूचे सरपंच संदीप आजबे, माजी सरपंच राजेंद्र भोसले, चापडगाव बीटचे हवालदार किरण जाधव, सोसायटीचे चेअरमन सचिन भवर, कर्जत तालुका भाजपचे उपाध्यक्ष विजय भोसले, युवराज धावडे, बाळासाहेब कोठावळे, रावसाहेब शिंदे, बापू शेंडकर, संदीप भांडवलकर, राम मुळे, राहुल भवर तसेच विद्यालयाची माजी विद्यार्थिनी कुमारी मयुरी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात रक्षाबंधन व वृक्षलागवडीचा कार्यक्रमही घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री श्रीपाद आडकर यांनी केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कय्युम मोमीन सर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.




