राशीनच्या करीम शेखची राज्यकर निरीक्षक (STI) पदी निवड: हलाखीच्या परिस्थितीवर मात करत मिळवले यश


राशीन (प्रतिनिधी: जावेद काझी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेतून राशीन येथील करीम शकील शेख याची राज्यकर निरीक्षक (State Tax Inspector – STI) पदी निवड झाली आहे. त्याच्या या दैदिप्यमान यशामुळे राशीन शहर व परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. श्रीमंत भोलेनाथ चौक मित्र परिवाराच्या वतीने गावात विविध ठिकाणी करीमच्या अभिनंदनाचे बॅनर झळकत आहेत.
हलाखीच्या परिस्थितीवर जिद्दीने मात
सर्वसामान्य कुटुंबातील करीमच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. वडील शकील शेख यांचे घड्याळ दुरुस्ती व विक्रीचे दुकान होते, मात्र मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे दुकान बंद करावे लागले. अशा कठीण काळात आई फरजाना यांनी टेलरिंगचे काम करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावला. आई-वडिलांनी कष्ट करीत रहीम या मुलाला ‘हाफिज’ बनवले, तर करीमच्या शिक्षणासाठी सर्व ताकद पणाला लावली. पालकांचे कष्ट आणि त्याग डोळ्यांसमोर ठेवून करीमने अथक परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर हे यश संपादन केले.

करीम शेख याचा शैक्षणिक व स्पर्धा परीक्षेतील प्रवास: प्राथमिक शिक्षण: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राशीन माध्यमिक शिक्षण: श्री जगदंबा विद्यालय, राशीन उच्च माध्यमिक: दादा पाटील महाविद्यालय, कर्जत (१२ वी विज्ञान शाखेत अपयश आले, मात्र हार न मानता त्याने प्रवास सुरू ठेवला)
पदवी: मॉडर्न कॉलेज, पुणे स्पर्धा परीक्षांचा संघर्ष: यूपीएससी मुख्य परीक्षेत अपयश आले. तसेच २०२४ च्या राज्यसेवा परीक्षेत अवघ्या १ गुणाने संधी हुकली.
यशस्वी भरारी: २०२५ च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेची संधी समोर असतानाही, रणनीती बदलून MPSC गट-ब (Non-Gazetted) परीक्षेतून पोस्ट मिळवण्याचा निर्धार केला आणि पहिल्याच प्रयत्नात ‘राज्य कर निरीक्षक’ (STI) पदाला गवसणी घातली.

सततचे अपयश आणि बिकट परिस्थिती या सर्व आव्हानांवर मात करत करीमने मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.



