कर्जतच्या इतिहासात रक्तदानाचा विक्रम करण्याचा निर्धार! १८ ऑगस्टला ‘महा रक्तदान’


कर्जत | प्रतिनिधी : माणुसकीचे नाते जोडणारे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. अत्यवस्थ रुग्णांसाठी रक्ताचा प्रत्येक थेंब जीवदान ठरू शकतो. याच सामाजिक बांधिलकीतून कर्जत मोबाइल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीने तालुकास्तरीय ‘मेगा ब्लड डोनेशन कॅम्प २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. कर्जत तालुक्याच्या इतिहासातील विक्रमी रक्तपिशव्या संकलित करण्याचा निर्धार या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत हे महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. कर्जत शहरातील सर्व मोबाइल शॉप्स या दिवशी बंद ठेवून मोबाइल व्यावसायिक रक्तदानाच्या सामाजिक उपक्रमात सहभागी होणार आहेत. ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल असोसिएशनने दिलगिरी व्यक्त करत “चला कुटुंबासह रक्तदान करूया, माणुसकीचं एक पाऊल पुढे टाकूया! असे आवाहन केले आहे.
शिबिराचे आयोजन कर्जत मोबाइल रिटेलर्स असोसिएशन करत असून अहिल्यानगर मोबाइल रिटेलर्स असोसिएशन यांचे सहकार्य लाभत आहे. तसेच सामाजिक संघटना, कर्जत व्यापारी संघटना, डॉक्टर असोसिएशन आणि इतर विविध घटकांचे सहकार्य या उपक्रमाला मिळणार आहे.
२०२२ च्या विक्रमी रक्तसंकलनानंतर पुन्हा निर्धार
अहिल्यानगर मोबाइल रिटेलर्स असोसिएशनने २०२२ मध्ये कर्जतसह विविध तालुक्यांत सामाजिक बांधिलकी जपत महा रक्तदान शिबिराचे आयोजन करून विक्रमी रक्तसंकलन केले होते. यंदाही त्याच धर्तीवर विक्रमी रक्तदानाचा संकल्प करण्यात आला आहे. रक्तदानाची चळवळ समाजात अधिक व्यापक व्हावी आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

विज्ञानाने मोठी प्रगती केली असली तरी मानवी रक्ताला कृत्रिम पर्याय अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे एका व्यक्तीने स्वेच्छेने केलेले रक्तदान दुसऱ्या गरजू व्यक्तीसाठी जीवनदायी ठरू शकते. अनेक उपचारांमध्ये रक्ताबरोबरच विविध रक्तघटकांचीही आवश्यकता भासते. त्यामुळे रक्तदानाचे महत्त्व अधिक वाढले आहे.
कर्जतच्या या महा रक्तदान शिबिराला व्यापक प्रतिसाद मिळवून देत कर्जतचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर ठळकपणे उमटविण्यासाठी नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी, युवकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन कर्जत तालुका मोबाइल रिटेलर्स असोसिएशनचे तालुकाध्यक्ष महेश तोरडमल व सदस्यांनी केले आहे.
शिबिराचे ठिकाण : HDFC बँकेच्या वर, शिवहर्ष Banquet Hall, कर्जत वेळ : सकाळी ९ ते रात्री ८ दिनांक : मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६



