राशीनचे सुपुत्र राजेंद्र नष्टे यांना ‘आदर्श प्राचार्य राष्ट्र गौरव पुरस्कार’ प्रदान


राशीन (प्रतिनिधी : जावेद काझी):
शिक्षण क्षेत्रात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याचा ठसा उमटवत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणारे राशीनचे सुपुत्र प्राचार्य राजेंद्र नष्टे यांना ‘आदर्श प्राचार्य राष्ट्र गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा गौरव झाल्याने राशीन परिसराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दिनांक ३० ऑगस्ट रोजी दुपारी १२:४५ वाजता आळंदी येथील ‘द कल्चर हॉटेल’ येथे अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. युवराज ठाकरे हे होते, तर उद्घाटन भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्तीताई देसाई यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी मेघराज राजेभोसले यांची विशेष उपस्थिती लाभली. तृप्तीताई देसाई यांच्या हस्ते राजेंद्र नष्टे यांना हा मानाचा ‘आदर्श प्राचार्य राष्ट्र गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
राजेंद्र नष्टे यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल आणि त्यांना मिळालेल्या या राष्ट्रीय स्तरावरील सन्मानाबद्दल राशीन परिसरातील ज्येष्ठ नागरिक, शिक्षणप्रेमी आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

यावेळी शरदचंद्र शेटे, शहाणे गुरुजी, घोडके गुरुजी, देविदास सोनवणे सर, देविदास साळवे, ससाने गुरुजी, भा. को. साळवे गुरुजी, कदीर शेठ यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी प्राचार्य नष्टे यांच्या शैक्षणिक कार्याचे मनापासून कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



