राशीन येथील श्री जगदंबा देवस्थान जमीन उत्खनन प्रकरण: महसूल विभागाकडून पंचनामा पूर्ण
दोषींवर कडक कारवाई आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी


राशीन प्रतिनिधी जावेद काझी. :- राशीन येथील प्रसिद्ध श्री जगदंबा देवस्थानच्या मालकीच्या गट क्रमांक १४५८/१ या जमिनीतून बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणावर मुरूम उपसा झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महसूल विभागाने तातडीने पावले उचलत घटनास्थळी भेट देऊन अधिकृत पंचनामा केला आहे. या कारवाईमुळे मुरूम तस्करांचे धाबे दणाणले असून, आता दोषींवर प्रत्यक्ष दंडात्मक आणि फौजदारी कारवाई कधी होणार, याकडे राशीनकरांसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
देवस्थानच्या जागेत विनापरवाना अवैध उत्खनन होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर मंडळ अधिकारी विश्वास राठोड आणि स्थानिक तलाठी यांनी संयुक्तपणे घटनास्थळाची पाहणी केली. पाहणीदरम्यान बेकायदेशीर मुरूम उत्खननाचे स्पष्ट पुरावे व खुणा आढळून आल्याने महसूल कर्मचाऱ्यांनी जागेवरच पंचनामा पार पाडला. यानंतर आता ‘ईटीएस’ (इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन) मशीनद्वारे जागेचे अचूक मोजमाप केले जाणार असून, नेमका किती ब्रास मुरूम चोरीला गेला आहे याची निश्चित आकडेवारी समोर येणार आहे.

दोषींवर कायद्याचा धाक बसणे आवश्यक
पवित्र देवस्थानच्या जमिनीवर डल्ला मारणाऱ्यांवर केवळ कागदी पंचनामा न करता, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी तीव्र भावना स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे. महसूल व पोलीस प्रशासनाने या प्रकरणात कठोर महसुली दंड ठोठावून दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
“देवस्थानच्या जमिनीतून झालेली मुरूम चोरी हा अतिशय गंभीर प्रकार आहे. महसूल विभागाने पंचनामा केला असला तरी हा विषय केवळ कागदावर राहता कामा नये. या चोरीत गुंतलेल्या लहान-मोठ्या सर्व तस्करांचा शोध घेऊन त्यांच्यावर प्रशासनाने कडक कारवाई केलीच पाहिजे.”

— सुनील देविदास रेणुकर (तक्रारदार तथा गुरव पुजारी) व रवींद्र दामोदरे (जिल्हा उपाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – आठवले गट)
पंचनाम्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता महसूल आणि पोलीस प्रशासन प्रत्यक्ष कारवाईचा हातोडा कधी चालवणार आणि या मुरूम चोरीमागील मुख्य सूत्राधार कधी गजाआड होणार, याकडे संपूर्ण परिसराचे डोळे लागले आहेत.



