राशीनच्या श्री जगदंबा देवी मंदिरात रांगोळीतून साकारले ‘श्री यमाई देवी’चे विलोभनीय रूप!
कुमारी गौरी राजगुरू हिची अद्भूत हस्तकला; गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांसाठी ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू


राशीन (प्रतिनिधी – जावेद काझी): – कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री जगदंबा देवी मंदिर, राशीन येथे गुरुपौर्णिमेच्या औचित्याने भक्ती आणि कलेचा एक अद्भूत संगम पाहायला मिळाला. उत्सवाच्या या मंगलमयी वातावरणात मंदिरातील पुजारी शिरीष रेणुकर यांची भाची कुमारी गौरी राजगुरू हिने आपल्या कल्पकतेच्या व हस्तकलेच्या जोरावर मंदिरातील कासवाजवळ जमिनीवर श्री यमाई देवीचे हुबेहूब आणि भव्य रांगोळी रूप साकारले.
अथक ५ तासांच्या मेहनतीतून साकारली जिवंत कलाकृती

रांगोळी कलाकार गौरी हिने सलग पाच तास अथक परिश्रम करून ही आकर्षक रांगोळी पूर्ण केली. यामध्ये देवीच्या डोळ्यांमधील करारी भाव, अलौकिक सात्त्विक तेज आणि दागिन्यांचे नाजूक नक्षीकाम रंगांच्या अचूक वापराद्वारे अत्यंत वेधकपणे रेखाटण्यात आले होते. यावेळी रांगोळी पद्धतीचा सुरेख वापर करून साकारलेली ही भव्य कलाकृती पाहताना साक्षात आदिशक्ती समोर उभी असल्याचा भास भाविकांना होत होता.

दर्शनासाठी गर्दी; सोशल मीडियावरही कौतुकाचा वर्षाव
ही जिवंत वाटणारी कलाकृती पाहण्यासाठी मंदिर परिसरात नागरिकांनी व भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच या रांगोळीचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, गौरीच्या या उत्कृष्ट कलेचे, संयमाचे आणि भक्तीभावाचे सर्व स्तरातून प्रचंड कौतुक केले जात आहे.


