गरिबांवर अन्याय करून प्रस्थापितांना प्राधान्य – रखमाजी रुपनर यांचा आरोप


(कर्जत | प्रतिनिधी) : – धालवडी राक्षसवाडी सेवा सोसायटीच्या संचालक निवडीनंतर गावात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निवड प्रक्रियेत अन्याय झाल्याचा गंभीर आरोप रखमाजी रुपनर यांनी करत प्रस्थापित मंडळींवर अन्यायपूर्ण हस्तक्षेपाचा आरोप केला आहे.
रुपनर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “या सोसायटीतील संचालकपदाची जी जागा होती ती माझे वडील कै. विठ्ठल रुपनर यांच्या नावे होती. त्यांच्या निधनानंतर त्या जागेवर माझी नैसर्गिक पात्रता असूनही गावातील काही प्रस्थापित मंडळींनी हस्तक्षेप करून ती जागा स्वतःकडे खेचून घेतली. हे केवळ गरिबांच्या हक्कांवर गदा आणणारे आणि सत्तेच्या जोरावर अन्याय करणारे कृत्य आहे.”

ते पुढे म्हणाले, “मी व माझे कुटुंब अनेक वर्षांपासून या सोसायटीचे निष्ठावान सदस्य आहोत. माझ्या वडिलांनी गावासाठी प्रामाणिकपणे काम केले, पण आज त्यांच्या निधनानंतर आम्हाला न्याय मिळत नाही. गावातील काही प्रभावशाली मंडळी एकत्र येऊन सामान्य माणसाचा हक्क हिरावून घेत आहेत. हे लोकशाहीच्या आणि सहकार चळवळीच्या तत्त्वांना काळीमा फासणारे आहे.”
या प्रकरणाबाबत ग्रामस्थांमध्येही मोठी चर्चा रंगली आहे. अनेक ग्रामस्थांनी रुपनर यांच्या आरोपांना पाठिंबा दर्शविला असून, या निवड प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचे सांगत प्रशासनाकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे.

रुपनर यांनी यावेळी ग्रामस्थांना आवाहन करताना म्हटले, “काही मोजक्या लोकांच्या मर्जीवर चालणाऱ्या या प्रस्थापितांच्या राजकारणाला आता ग्रामस्थांनी जाग येण्याची गरज आहे.”
धालवडी राक्षसवाडी सेवा सोसायटीच्या निवडीनंतर निर्माण झालेल्या या वादामुळे गावातील वातावरण तापले असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



