नांदगावात किराणा दुकानाच्या आड दारूचा अड्डा; कर्जत पोलिसांची धडक कारवाई..


कर्जत (प्रतिनिधी) : – कर्जत तालुक्यातील नांदगाव येथे किराणा दुकानाचा आडोसा घेऊन सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर कर्जत पोलिसांनी रविवारी दुपारी अचानक छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

गुप्तबातमीच्या आधारे पोलिसांनी दुपारी नांदगाव येथे धडक देत तपास केला असता, संबंधित दुकानातून कोणतीही अधिकृत परवानगी नसताना गावठी हातभट्टीची दारू, देशी-विदेशी दारू तसेच बिअरची खुलेआम विक्री सुरू असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी हुसेन अंबीर सय्यद (वय ६५, रा. नांदगाव, ता. कर्जत) हा दारूची विक्री करताना पोलिसांच्या ताब्यात सापडला.
पोलिसांनी घटनास्थळावरून विदेशी दारूच्या बाटल्या, मोठ्या प्रमाणावर देशी दारू तसेच सुमारे ४० लिटर गावठी हातभट्टीची दारू असा एकूण ३६,९६५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दीपक कोल्हे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलिसांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.




