कर्जत पोलिसांची तत्परता ठरली नागरिकांसाठी दिलासा; हरवलेले मोबाईल शोधून मूळ मालकांकडे सुपूर्द


कर्जत / प्रतिनिधी : – आजच्या डिजिटल युगात मोबाईल हा केवळ संपर्काचे साधन नसून प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. अशा परिस्थितीत मोबाईल हरवणे म्हणजे मोठी डोकेदुखी ठरते. मात्र कर्जत तालुक्यातील नागरिकांसाठी कर्जत पोलिसांनी दिलासा देणारी कामगिरी करत सुमारे २ लाख १० हजार रुपये किमतीचे हरवलेले मोबाईल शोधून मूळ मालकांकडे परत दिले आहेत.

राशिन येथील जानभरे वस्तीतील अमोल बबन जानभरे, खेड येथील महेश दशरथ मोरे, थेरवडी येथील निकिता वसंत कांबळे, आखोणी येथील वसंत कानिफनाथ खराडे, राशिन येथील अशोक निवृत्ती साळवे, दगडी बारडगाव येथील कोमल सुरेश जाधव तसेच भांबोरा येथील पोपट नवनाथ कोरे यांचे मोबाईल विविध ठिकाणी हरवले होते. मोबाईल मिळण्याची आशा जवळजवळ मावळलेली असतानाच कर्जत पोलिसांच्या प्रयत्नांमुळे हे मोबाईल पुन्हा त्यांच्या हाती आले.
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई यशस्वीरीत्या पार पडली. पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांच्या सूचनेनुसार पोलीस कर्मचारी राजेंद्र थोरात, दीपक कोल्हे, लक्ष्मण कोल्हे व संजय सानप यांनी विशेष मेहनत घेत हरवलेले मोबाईल शोधून काढले.

तांत्रिक माहिती, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि चिकाटीच्या जोरावर पोलिसांनी ही कामगिरी फत्ते केली. मोबाईल परत मिळाल्याने संबंधित नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकला. अनेकांनी कर्जत पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक करत मनापासून आभार व्यक्त केले.
नागरिकांच्या अडचणींना संवेदनशीलपणे समजून घेऊन मदतीचा हात देणारी ही कामगिरी कर्जत पोलिसांच्या सामाजिक जबाबदारीचे आणि कर्तव्यनिष्ठेचे उत्तम उदाहरण ठरत आहे. अशा सकारात्मक कार्यामुळे पोलिसांविषयीचा विश्वास अधिक दृढ होत असून, समाजात सुरक्षिततेची भावना बळकट होत आहे.