Advertisement
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनसंपादकीय

रस्ते अपघात : जबाबदारी कोण घेणार ? : – स्वाती पाटील.

Samrudhakarjat
4 0 1 2 3 5

समृध्द कर्जत :- कुणाचातरी अपघात झाल्याची बातमी धडकते आणि काळजात धाडकन धडकी भरते. सकाळी घरातून कामानिमित्त बाहेर पडलेला माणूस अपघातात गेल्याची दुर्दैवी बातमी त्याच्या घरच्यांना जेव्हा ऐकायला मिळत असेल तेव्हा ते त्यांच्यासाठी किती धक्कादायक असेल याची कल्पना सुद्धा निशब्द करणारी आहे. रोज अशा कितीतरी घटना ऐकून सुन्न व्हायला होतेय. या रस्ते अपघातांच्या वाढत चाललेल्या मालिकांमुळे माणसांचे मरण भयंकर स्वस्त झालेय आजकाल…

आज-काल प्रत्येकाकडेच कसले ना कसले वाहन आहे. प्रत्येकाला कामानिमित्त घराबाहेर पडावेच लागते. रस्त्यांवरची वाहनांची वाढती संख्या बघता नजरचुकीने, घाईगडबडीत बरेच असे अपघात घडतात. क्षणाची चूक कायमचं अपंगत्व देऊ शकते, आयुष्यातून उठवू शकते इतकी भयंकर तीव्रता या अपघातांची असते. जीव मुठीत धरुन वाहन चालवावे लागते आहे. याला आळा घालायचा असेल तर सर्वांनीच नियमांचे पालन करायला हवे. पण तसे होत नाही.

        आपल्या देशात होणाऱ्या अपघातांमुळे दरवर्षी दीड लाखाहून अधिक लोकांना जीव गमावा लागतो. हा आकडा खूप मोठा आहे. इतर देशांमध्ये हे प्रमाण खूप कमी आहे, कारण अपघात होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी तिथले नागरिक घेत असतात. म्हणजेच तिकडे कुठल्याही नियमांचे काटेकोरपणे पालन होत असते. एवढेच नाही तर ‘नियम हे आपल्या सुरक्षेसाठी, आपल्या हितासाठीच बनवलेले असतात.’ या गोष्टी तिथल्या मुलांनासुद्धा शालेय वयापासूनच शिकवल्या जातात.

         आणि आपल्याकडे नेमकी उलट परिस्थिती. 

आपल्याकडे प्रगती झाली, सुधारणा झाल्या, रस्त्यांची दुर्दशा संपली, खडखडीत रस्ते सरधोपट झाले आणि आपले वेगावरचे नियंत्रणच सुटले.

         इथे जो तो सुसाट आहे, वेळ कुणाकडेच नाही, ज्याला त्याला घाई आहे, वाहनाच्या वेगावर किती नियंत्रण ठेवण्याचे याचे भान कित्येकांना नाही, वेगाला आवर घालण्यासाठी लावलेले फलक आणि स्पीड ब्रेकर याची अनेकांना फिकीर नाही, यात तरुणांचीच संख्या जास्त. त्यांच्या याच बेफिकिरीमुळे एखाद्या चांगल्या माणसाचा चूक नसताना हाकनाक जीव जातो. कधी कधी स्वतः वरही बेतते, हे दुर्दैवी आहे. 

          वेगावरच्या नियंत्रणाइतकच अपघात होण्यामागचं दुसरं मुख्य कारण म्हणजे दारू पिऊन गाडी चालवणारे.. 

एखादा अपघात झाला तर तिथे चौकशी केल्यानंतर कळते की जो धडकला तो एक तर वेगाच होता नाहीतर नशेत होता. असे नशेत आणि वेगात असणारे बेफिकीर चालक हेच सर्रास अपघातांचे मुख्य कारण आहेत. याला आळा बसणं गरजेचं आहे. यासाठी कायद्याचा आणि नियमांचा धाक आणि दरारा प्रत्येकाला असणं गरजेचं आहे. पण इथे सगळे नियम धाब्यावर….

      कालपरवा अपघातात पतीचं निधन झालेल्या एका ओळखीतल्या महिलेला भेटायला गेले होते. अपघात झाला तेव्हा त्याची काहीही चूक नव्हती. एका पिकपवाल्याने मागून जोराची धडक दिली आणि दवाखान्यात नेण्यापूर्वीच त्याचं निधन झालं. नंतर कळलं की तो धडकलेला पीकप ड्राईव्हर दारु पिलेला होता. त्याला शिक्षा काय होईल, कधी होईल माहिती नाही, तो नंतरचा विषय. पण त्याच्या बेपर्वाईमुळे एक कुटुंब हकनाक उद्ध्वस्त झालेलं चित्र काळीज पिळवून टाकणारं आहे.

        अकाली वैधव्य आलेल्या त्या महिलेच्या पुढ्यात दोन छोटी लेकरं, शेजारी बसलेले पार थकलेले सासू सासरे, काही क्षणात मोडून पडलेला तिचा संसार आणि तिचा सुरू असलेला आक्रोश सुन्न करणारा होता. या आणि अशा कित्येक निरपराध आक्रोशाची जबाबदारी कोण घेणार ???

                                           – स्वाती पाटील.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker