CSR फाउंडेशन 2026–27 पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न..
अध्यक्षपदी सागर मेहेत्रे, सचिवपदी सागर मांडगे तर खजिनदारपदी अविनाश नेवसे यांची निवड


कर्जत : कर्जतमधील युवा व्यावसायिकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या CSR फाउंडेशनचा सन 2026–27 या वर्षासाठीचा पदग्रहण समारंभ राम-लता निवास, मेहेत्रे मळा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर साहेब, सर्व सामाजिक संघटनेचे शिलेदार व सेवानिवृत्त वनाधिकारी श्री. अनिल तोरडमल साहेब, समर्थ विद्यालयाचे प्राचार्य व रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत राऊत सर तसेच कोटा मेंटॉर्स स्कूलचे संस्थापक अध्यक्ष श्री. केशव आजबे सर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार व पदग्रहण समारंभ पार पडला.

यावेळी CSR क्लब 2026–27 च्या कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली. अध्यक्षपदी श्री. सागर मेहेत्रे, सचिवपदी श्री. सागर मांडगे तर खजिनदारपदी श्री. अविनाश नेवसे यांची निवड करण्यात आली.
अध्यक्ष श्री. सागर मेहेत्रे यांनी आत्तापर्यंत राबविलेल्या तसेच आगामी वर्षात फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी प्रास्ताविक श्री. सागर मांडगे यांनी केले. नयन खंदारे व अविनाश नेवसे यांनी मनोगत व्यक्त केले.

CSR फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांसोबतच सदस्यांमध्ये मैत्री दृढ करणे आणि व्यावसायिक वृद्धीसाठी एकमेकांना सहकार्य करणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सामाजिक बांधिलकी, युवकांचा सहभाग आणि समाजोपयोगी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास अशोक दळवी, गणेश मेहेत्रे, सचिन गोरे, शहाबाज आतार, मयूर शहाणे, विकास गोरे, रविंद्र काळे, अशोक तांबे, तुषार नेवसे, किरण शिंदे, नितिन राऊत,अमोल गर्जे आदी सदस्य सहकुटुंब उपस्थित होते. सूत्रसंचालन दादासाहेब शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन अनुज कुलथे यांनी केले…




