कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; अवैध गुटखा व मावा विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल


कर्जत | (प्रतिनिधी) – कर्जत तालुक्यात अवैध गुटखा व माव्याच्या विक्रीविरोधात कर्जत पोलिसांनी धडक कारवाई करत एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत सुमारे ११ हजार ८७२ रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी कर्जत पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई व पेट्रोलिंग सुरू असताना, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र थोरात यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. कुळधरण गावाच्या शिवारातील बसस्थानक परिसरात असलेल्या ‘आईसाहेब पान स्टॉल’वर प्रतिबंधित गुटखा व माव्याची विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली.

त्यानुसार पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. या वेळी गिरीश आण्णा सुपेकर (वय २१, रा. कुळधरण) हा गुटखा विक्री करताना आढळून आला. त्यानंतर पान स्टॉलची झडती घेतली असता विविध कंपन्यांचे प्रतिबंधित गुटखा, तंबाखू, मावा, सुपारीचा चुरा व सुगंधी तंबाखू असा मोठा साठा आढळून आला.
पोलिसांनी पंचनाम्याद्वारे सदर मुद्देमाल जप्त करून त्यातील नमुने रासायनिक तपासणीसाठी स्वतंत्रपणे पाठवले आहेत. उर्वरित साहित्यावर सील लावून सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३, २७४ व २७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण अंधारे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे व पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांच्या आदेशानुसार करण्यात आली. या मोहिमेत परि. पोसई सचिन भाबड, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र थोरात, पोलीस कॉन्स्टेबल दीपक कोल्हे, किरण घोंगडे, संजय सानप, लक्ष्मण ढवळे व चालक पोलीस शिपाई देसाई सहभागी होते.

आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात कर्जत पोलिसांनी उचललेले हे पाऊल नागरिकांच्या आरोग्य रक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.



