भिगवण प्रकरणात पुन्हा ट्विस्ट; ‘मला आईकडे जायचंय’, न्यायालयात मुलीने जबाब बदलला…
मला आईकडे जायचंय, असा जबाब भिगवण अपहरण प्रकरणातील पीडित मुलीने आज न्यायालयात दिला आहे.


Bhigwan Kidnap : भिगवण अपहरण प्रकरणा नवा ट्विस्ट समोर आलायं. न्यायालयात भिगवण प्रकरणातील मुलीने आपली जबाब बदललायं. मुलीने आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केलीयं. भिगवण प्रकरणातील मुलगी मुस्लिम समाजातील तरुणासोबत निघून गेल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.

इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायलयासमोर आज सुनावणी पार पडली. यावेळी मुलीने आपल्याला आईकडे आणि मामाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 20 फेब्रुवारी रोजी बारामती सत्र न्यायालयासमोर तरुणीने आपल्या आईसोबत जाण्यास नकार दिला होता. जहीर शेखसोबतच जाणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आज न्यायालयात व्हीसीद्वारे सुनावणी पार पडली. व्हिसीद्वारे न्यायालयाने तरुणीला काही प्रश्न विचारले असता तिने आई आणि मामासोबत जाण्याची इच्छा व्यक्त केलीयं.

मुलीने इच्छा व्यक्त केल्यानंतर इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयाने पीडित मुलीचा ताबा आई आणि मामा यांच्याकडे देण्याबाबतचा आदेश पारित केला आहे. सध्या पीडित मुलगी सुधारगृहामध्ये आहे. या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानंतर आता मुलीचा ताबा आई आणि मामा यांच्याकडे दिला जाणार असल्याचं स्पष्ट झालंय.
भिगवणमध्ये 21 वर्षीय तरुणीचे आई अन् भावाच्या डोळ्यात चटणी टाकून अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी आमदार संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश मोर्चा काढला होता. त्यानंतर तरुणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. या व्हिडिओमध्ये माझे अपहरण झालेले नसून स्वत:च्या इच्छेने गेले असल्याचा दावा तरुणीने केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ दबावाखाली काढल्याचा आरोप आमदार पडळकरांनी केला. त्यानंतर तरुण-तरुणी बारामती पोलिस ठाण्यात हजर झाले होते. दरम्यान, न्यायालयासमोर दंड प्रक्रिया संहिता कलम 164 अंतर्गत नोंदवलेल्या जबाबात तरुणीने आपल्या आईच्या कुशीत जाण्यास नकार दिला होता. त्यानंतर न्यायायलायत सुनावणी पार पडली.




