मिरजगाव पोलिसांचा ड्रग्ज माफियांना दणका! प्रतिबंधित ड्रग्ज इंजेक्शनचा साठा जप्त
बाभूळगाव खालसा येथे धाड – ५८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

(समृध्द कर्जत प्रतिनिधी) :- अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजगाव पोलिसांनी मानवी आरोग्यास अपायकारक व विक्रीस प्रतिबंधित असलेल्या ड्रग्ज इंजेक्शनविरोधात मोठी कारवाई करत ५८ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एका युवकाला अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी पप्पू उर्फ प्रविण लाला भोसले हा फरार झाला आहे.
मिरजगाव पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, बाभूळगाव खालसा येथील पप्पू उर्फ प्रविण लाला भोसले हा MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP हे इंजेक्शन बेकायदेशीररित्या विक्रीसाठी पुरवत आहे. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्रीस बंदी असलेल्या या इंजेक्शनचा वापर नशेसाठी तसेच जिममध्ये कृत्रिमरीत्या स्टॅमिना वाढविण्यासाठी केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्या पथकाने बाभूळगाव खालसा येथे सापळा रचून रोहन भाऊसाहेब लाडाणे (वय २२) यास ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत संबंधित इंजेक्शन आढळून आल्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी प्रविण भोसले यांच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत एकूण ७ प्रतिबंधित ड्रग्ज इंजेक्शन जप्त करण्यात आले.
या प्रकरणी रोहन लाडाणे व प्रविण उर्फ पप्पू लाला भोसले यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, १२५, २७८ तसेच औषधिद्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियम १९४० मधील कलम १८(सी) व २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन लाडाणे याला अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी प्रविण भोसले याचा शोध सुरू आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या धडक कारवाईबद्दल मिरजगाव व बाभूळगाव खालसा परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून प्रतिबंधित ड्रग्ज किंवा अमली पदार्थांची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


