तरुणावर लोखंडी रॉड, दगड, दांडक्यांनी जीवघेणा हल्ला; मध्यस्थी करणाऱ्यालाही मारहाण
अॅट्रॉसिटीसह गंभीर कलमांखाली ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कर्जत | प्रतिनिधी :- कर्जत शहरातील संजीवनी वाईन्स दुकानासमोर जुन्या वादाच्या कारणावरून एका तरुणावर लोखंडी रॉड, दगड, लाकडी दांडके आणि फायबरच्या पाईपने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तुंबळ हाणामारीत दोन जण जखमी झाले असून, कर्जत पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध अॅट्रॉसिटीसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १ जून रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास कर्जत येथील संजीवनी वाईन्स दुकानासमोर ही घटना घडली. याप्रकरणी तेजस्विनी सिताराम भैलुमे (वय २०, रा. सिद्धार्थनगर, कर्जत) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, फिर्यादीचा भाऊ दत्ता भैलुमे यांच्यासोबत असलेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी अक्षय विठ्ठल राऊत, आशिष हनुमंत राऊत, किरण राऊत (तिघे रा. कर्जत) तसेच महादेव शिंदे (रा. कापरेवाडी, ता. कर्जत) यांनी संगनमत करून दत्ता भैलुमे यांच्यावर हल्ला चढविला. आरोपींनी लोखंडी रॉड, खोऱ्याचे लाकडी दांडके, दगड आणि फायबरच्या पाईपने बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या हल्ल्यात दत्ता भैलुमे यांच्या बरगडीला गंभीर दुखापत झाली असून, दोन्ही हात व पायांवरही मार लागला आहे. दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आलेले प्रणव गोरे यांनाही आरोपींनी लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीनुसार, हल्ल्यादरम्यान आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. जखमींना प्रथम उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर आणि ससून रुग्णालय, पुणे येथे हलविण्यात आले आहे.
या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.



