कर्जत पोलिसांचा मराठी कॅफेवर छापा! जोडपी आढळल्याने चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
अश्लील कृत्यांना जागा उपलब्ध करून दिल्याचा आरोप; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल


कर्जत | प्रतिनिधी :- कर्जत शहरातील काळदाते कॉम्प्लेक्स परिसरात सुरू असलेल्या ‘मराठी कॅफे’वर कर्जत पोलिसांनी शनिवारी सायंकाळी धडक कारवाई करत कॅफे चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. तरुण मुला-मुलींना अश्लील हावभाव अथवा कृत्य करण्यासाठी जागा उपलब्ध करून देत त्याबदल्यात तासानुसार पैसे घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड हे पोलीस पथकासह कर्जत शहरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली. त्यानुसार काळदाते कॉम्प्लेक्स येथील ‘मराठी कॅफे’मध्ये रोहित अशोक होले (वय २६, रा. लोणी मसदपूर, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) हा मुला-मुलींना अश्लील कृत्यांसाठी जागा उपलब्ध करून देत असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक गायकवाड व त्यांच्या पथकाने सायंकाळी सुमारे ५.१५ वाजता कॅफेवर छापा टाकला. कारवाईदरम्यान दोन जोडपी आढळून आली. तसेच संबंधित कॅफेमध्ये विनापरवाना खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याचेही निदर्शनास आल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी कॅफे चालक रोहित होले याच्याविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३३ (एक्स)(अ) व १३१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान आढळून आलेल्या जोडप्यांना समज देऊन त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.


