श्री गोदड महाराज ट्रस्टचा मोठा निर्णय; पावतीशिवाय देणगी नको, अफवा आणि राजकारणाला कडक इशारा

कर्जत | प्रतिनिधी :- श्री संत सदगुरू गोदड महाराज रथोत्सव सन २०२६ च्या तयारीला अधिकृतपणे प्रारंभ झाला असून, यंदाचा रथोत्सव सर्वसमावेशक, पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याचा निर्धार श्री गोदड महाराज ट्रस्टने केला आहे. रथोत्सवाच्या नियोजनासाठी स्वतंत्र व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली असून, विशेष म्हणजे २७ समाजातील प्रतिनिधींना समितीत स्थान देत सर्व समाजाचा सहभाग निश्चित करण्यात आला आहे.

ट्रस्टच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, रथोत्सव हा संपूर्ण गावाचा आणि भाविकांचा उत्सव असल्याने ग्रामस्थ, मानकरी, सेवेकरी आणि भाविकांनी एकदिलाने सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ‘धाकटी पंढरी’ म्हणून ओळख असलेल्या या तीर्थक्षेत्राची कीर्ती अधिक उंचावण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यावा, असे ट्रस्टने स्पष्ट केले.
यात्रेसाठी राज्यभरातून येणाऱ्या भाविक, व्यापारी आणि यात्रेकरूंना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, तसेच एकही भाविक दर्शनापासून वंचित राहणार नाही, यासाठी विशेष नियोजन करण्यात येत आहे. मंदिराच्या जिर्णोद्धार व मूळ स्वरूपातील पुनर्बांधणीच्या कामासाठी भाविकांनी स्वेच्छेने देणगी द्यावी, असे आवाहन करण्यात आले असून देणगीदारांना प्राप्तिकर कायद्यातील कलम ८०-जी अंतर्गत करसवलतीचा लाभ मिळणार आहे.

ट्रस्टने आर्थिक व्यवहारात पूर्ण पारदर्शकतेचा पुनरुच्चार करत अधिकृत पावतीशिवाय कोणालाही देणगी देऊ नये, असे स्पष्ट केले आहे. जमा होणाऱ्या प्रत्येक देणगीचा विनियोग महाराजांच्या कार्यासाठीच करण्यात येईल आणि त्याचा संपूर्ण हिशोब उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही ट्रस्टने दिली आहे.
रथोत्सवातील सेवा आणि पारंपरिक सेवाधिकार कायम राहतील, कोणाचाही अधिकार काढून घेण्यात आलेला नाही, त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे ट्रस्टने स्पष्ट केले. तसेच मंदिरातील सर्व धार्मिक कार्यक्रम ट्रस्टच्या अधिपत्याखालीच पार पडणार असून, रथोत्सवासारख्या पवित्र सोहळ्यात अफवा पसरवणे किंवा राजकारण करणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

श्री संत सद्गुरू गोदड महाराजांचे कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सर्व समाज, ग्रामस्थ, भाविक आणि सेवेकऱ्यांनी एकजुटीने सहकार्य करावे, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप पाटील आणि सचिव शशिकांत पाटील यांनी केले.
बैठकीस अध्यक्ष प्रदीप पाटील, उपाध्यक्ष प्रवीण घुले, सचिव शशिकांत पाटील, खजिनदार बिभीषण खोसे, ट्रस्टी रमेश तोरडमल, तानाजी पाटील, विश्वजीत पाटील, तसेच भास्कर भैलुमे, भाऊसाहेब तोरडमल, आदित्य शिरसागर, भैया ढेरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ, भाविक, सेवेकरी, मानकरी आणि श्री गोदड महाराज ट्रस्ट कमिटीचे सदस्य उपस्थित होते.



