राशीन येथे अंबादास जाधव यांच्या प्रयत्नातून २०० हून अधिक बांधकाम कामगारांना मोफत सुरक्षा व गृहपयोगी किटचे वाटप!


राशीन (प्रतिनिधी): जावेद काझी. :- राशिन येथील बांधकाम कामगार सेना संघटक जिल्हाप्रमुख अंबादास (तात्या) जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून आणि पुढाकारातून राशीन येथे कामगार सेनेतील महिला व पुरुष बांधवांसाठी एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात परिसरातील तब्बल २०० पेक्षा अधिक गरजू लाभार्थ्यांना अत्यावश्यक सुरक्षा आणि गृहपयोगी वस्तूंच्या दोन विविध किटचे मोफत वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम बांधकाम कामगार शिवसेना कार्याध्यक्ष संतोषभाऊ राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साहात पार पडला.

कामगारांच्या सुरक्षेची आणि दैनंदिन गरजेची काळजी घेत अत्यंत उत्कृष्ट व दर्जेदार कंपन्यांचे साहित्य या किटमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने पुढील वस्तूंचा समावेश होता सुरक्षा साहित्य: दर्जेदार हेल्मेट, उत्कृष्ट प्रतीचे बूट, हॅन्ड ग्लोज (हातमोजे), सोलर टॉर्च आणि बांधकाम साहित्य किट. घरगुती साहित्य: २ ब्लॅंकेट, २ खिडकी पडदे, २ स्टील थर्मास, चटई, २ रजाई, स्टील डबे. स्टोरेज: सामान ठेवण्यासाठी १ मोठी पेटी आणि २ लहान पेट्या.

मान्यवरांची प्रमुख उपस्थिती या भव्य कार्यक्रमाला धाराशिव उपजिल्हाप्रमुख अमर सरक, अहिल्यानगर जिल्हा उपप्रमुख चंदनसिंग आनंदसिंग परदेशी, पुणे प्रभाग प्रमुख सागर प्रभुणे, पुणे गटप्रमुख अक्षय हिंगे, राशीन शहराध्यक्ष नाझीम काझी, शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष विलास कानगुडे आणि मुख्य आयोजक व कामगार संघटक जिल्हाप्रमुख अंबादास जाधव यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते गरजू कामगारांना या साहित्याचे वाटप करण्यात आले.

अंबादास जाधव यांच्या माध्यमातून राशीन आणि परिसरातील गरजू लोकांना मदत करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अनेक वेळा अशा प्रकारच्या मोफत अत्यावश्यक किटचे व मदतीचे वाटप करून गोरगरीब व कामगार कुटुंबांना मोठा आधार दिला आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण आणि निस्वार्थी सामाजिक कार्याचे राशीन परिसरातून आणि सर्व स्तरातून भरभरून कौतुक होत आहे. या उपक्रमामुळे अनेक कामगार कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी जाधव यांच्या प्रती आभार व्यक्त केले आहेत.




