आई-वडीलांचे स्थान जीवनात महत्त्वाचे – पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव

निमगावडाकू (ता. कर्जत), दि. ३१: जीवनाला योग्य दिशा देण्याचे काम आई-वडील करतात. आपले उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी ते अनेक कष्ट सहन करतात, म्हणूनच मानवी जीवनात आई-वडीलांचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. दौलतराव जाधव यांनी केले.
श्री धाकोजी महाराज माध्यमिक विद्यालय, निमगावडाकू येथे आयोजित इयत्ता १०वीच्या सुयश चिंतन समारंभ कार्यक्रमात ते अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. जाधव यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील यश, शिक्षणाचे महत्त्व, तसेच शिक्षण कायद्याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना वाईट गोष्टींकडे लक्ष न देता चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात आणि देशाचे आदर्श नागरिक होण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या म्हणून अहिल्यानगर आकाशवाणीच्या निवेदिका व कराटे प्रशिक्षिका कु. शितल करांडे उपस्थित होत्या. कार्यक्रमाला विश्वकर्मा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि कर्जत नगरपंचायतीचे नगरसेवक श्री. प्रसाद ढोकरीकर, निमगावडाकूच्या सरपंच सौ. प्रियांका आजबे, उपसरपंच श्री. सिद्धार्थ धावडे, व्यापारी संघटनेच्या सदस्य सौ. मोहिणी कोठावळे, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ. सिमा भोसले व सौ. स्वाती पवार, सखी सावित्री समितीच्या सदस्या सौ. वंदना शेंडकर, सौ. सारिका जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक श्री. श्रीकांत भोसले, तसेच कोंभळी व जळकेवाडी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या समारंभात चित्रकला परीक्षेत व खेळांमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. श्रीपाद आडकर यांनी केले, तर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कयूम मोमीन यांनी उपस्थितांचे आभार मानले.