

कर्जत (प्रतिनिधी): – वाढदिवस म्हणजे फक्त हार, फुगे आणि बॅनर नव्हेत, तर समाजासाठी काहीतरी देण्याची संधी असते, हे विधान परिषदेचे सभापती ना. प्रा. राम शिंदे यांनी आपल्या कृतीतून पुन्हा एकदा दाखवून दिले. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जोगेश्वरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तसेच नागरेमळा येथील शाळेत विद्यार्थ्यांना वह्या, पेन व खाऊचे वाटप करून हा दिवस सामाजिक बांधिलकीतून साजरा करण्यात आला.

सभापती राम शिंदे यांनी केलेल्या आवाहनानुसार बॅनरबाजी, हारतुरे आणि मनोरंजनावर होणारा खर्च टाळत, उपेक्षित व गरजू घटकांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि आनंद हेच या वाढदिवसाचे खरे यश ठरले.

या कार्यक्रमास अहिल्यानगर जिल्हा परिषद माजी सदस्य प्रवीण घुले, उपनगराध्यक्ष संतोष (आप्पा) मेहेत्रे, मंडळ अध्यक्ष अनिल गदादे, नगरसेविका लंकाताई खरात, देविदास (आबा) खरात, नगरसेवक भास्कर भैलुमे, रविंद्र सुपेकर, विनोद दळवी, भाजपा नेते सचिन घुले, अमोल भगत (शहराध्यक्ष), प्रशांत शिंदे, मंगेश कचरे (शाळा समिती अध्यक्ष) यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम नगरसेविका लंकाताई खरात यांच्या माध्यमातून राबवण्यात आला.

यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांनी सांगितले की, ना. राम शिंदे यांच्या पुढाकारातून शाळेला ‘इंटरॲक्टिव्ह’ डिजिटल शैक्षणिक साहित्य उपलब्ध झाले असून, व्हिडिओ व कृतीआधारित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत आहे आणि शिक्षण अधिक आनंददायी होत आहे.
दरम्यान, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना राम शिंदे यांना भविष्यात राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी, अशी प्रार्थना श्री संत सद्गुरू गोदड महाराजांच्या चरणी केली. पहाटे गोदड महाराजांना महाभिषेक करून शिंदे यांच्या दीर्घायुष्य व यशस्वी राजकीय वाटचालीसाठी साकडे घालण्यात आले.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला आणि वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना व सामान्य माणसाला दिलासा देणारे हे उपक्रम समाजासमोर एक सकारात्मक आणि अनुकरणीय आदर्श ठरत असल्याची भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.




