दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथे चौथे अखिल भारतीय शिक्षिका साहित्य संमेलनाचे आयोजन…


कर्जत: केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर, संपूर्ण भारतातील स्त्रियांच्या जीवनात नवपरिवर्तन करणाऱ्या, स्त्री हक्काच्या प्रणेत्या, स्त्री शिक्षणाच्या उदगात्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षिका होत. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना उजाळा मिळावा, स्त्री सक्षमीकरणाचा जागर व्हावा म्हणून दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथील मराठी विभागाच्या वतीने चौथ्या अखिल भारतीय शिक्षिका साहित्य संमेलनाचे आयोजन शनिवार दि. ३ जानेवारी २०२६ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी सकाळी आठ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहात करण्यात आले आहे.

या साहित्य संमेलनात अहिल्यानगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शिक्षिका, साहित्यिक महिला सहभागी होणार आहेत. नवसाहित्यिक शिक्षिकांना सशक्त विचारपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच महिलांचे अर्थविश्व व नव तंत्रज्ञानाच्या जाणीवा समृद्ध करण्यासाठी आणि मराठी साहित्य विश्वाकडून शिक्षिकांच्या असलेल्या अपेक्षांची जाणीव करून देण्यासाठी हे एकदिवसीय साहित्य संमेलन आयोजित केले आहे.
रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके हे या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तर रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार हे या संपूर्ण साहित्य संमेलनाचे निमंत्रक आहेत.

एकदिवसीय अखिल भारतीय चौथ्या शिक्षिका साहित्य संमेलनात सकाळच्या सत्रात ८.०० वाजता कर्जत शहरातून ग्रंथदिंडी व शोभायात्रा निघणार असून त्यात महात्मा गांधी विद्यालय, सौ.सो.ना.सोनमाळी कन्या विद्यामंदिर व दादा पाटील महाविद्यालयातील विद्यार्थिनी व शिक्षक सहभागी होतील. कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षा व सर्व नगरसेविका, सर्व सामाजिक संघटना कर्जत, रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी, सी.एस.आर क्लब कर्जत, माजी विद्यार्थी संघ या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शोभायात्रा व ग्रंथदिंडीची सुरुवात होईल.
सकाळी ९:३० ते ११:३० या वेळेत उद्घाटनसत्र संपन्न होईल. संमेलनाच्या उद्घाटक म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य व ईश्वरपूर- सांगली येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या सचिव सरोज (माई) नारायण पाटील, संमेलनाध्यक्ष म्हणून पुणे येथील जेष्ठ विचारवंत व लेखिका अंजली कुलकर्णी, प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने, ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीच्या विश्वस्त सौ. सुनंदाताई राजेंद्र पवार, प्रमुख अतिथीमध्ये कर्जतचे तहसीलदार रवी सतवन, गटशिक्षणाधिकारी प्रदीप चव्हाण तसेच विशेष उपस्थितीमध्ये रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादासजी पिसाळ, राजेंद्र निंबाळकर, बप्पासाहेब धांडे तसेच रयत शिक्षण संस्थेचे सर्व जनरल बॉडी सदस्य व मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, आजी-माजी विद्यार्थी कार्यकारणी सदस्य उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटन सत्रानंतर रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, अरुण कडू पाटील यांच्या हस्ते साहित्यिक, समाजिक व शैक्षणिक कार्य करणाऱ्या चौदा महिलांना शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
सकाळी ११:३० ते १ या वेळेतील दुसऱ्या सत्रात निर्माती, लेखिका, अभिनेत्री आणि प्रबोधनकार मेघना संजय झुझम (भिंबर पाटील) व सहकारी ‘तुझीया नामाचा गजर’ ही भक्तिमय नाटिका सादर करणार आहेत. स्त्री संत साहित्य आणि संत लोककला यावर आधारित भक्तिमय नाटिका-संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत सोयराबाई, आणि संत कान्होपात्रा यांच्या भक्तीवर आधारित असेल.
दुपारी २ ते ३:३० या वेळेतील तिसऱ्या सत्रात ‘महिलांचा राजकारणातील सहभाग: सत्य आणि कथ्य’ या विषयावर गोलमेज चर्चा रंगणार असून या सत्राच्या अध्यक्षा माजी जि. प. अध्यक्षा विमलताई ढेरे असतील. या गोलमेज चर्चेत कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षा रोहिणीताई घुले, माजी नगराध्यक्षा उषाताई राऊत, प्रतिभाताई भैलुमे, माजी जि. प. अध्यक्षा मंजुषाताई गुंड, माजी पं. स. सभापती मीनाक्षी साळुंखे, अश्विनीताई कानगुडे, कर्जत नगरपंचायतच्या नगरसेविका ताराकाकू कुलथे, मोहिनीताई पिसाळ, ज्योतीताई शेळके, लंकाताई खरात, छायाताई शेलार, हर्षदाताई काळदाते, अश्विनीताई दळवी, मोनालीताई तोटे, सुवर्णाताई सुपेकर, चांदा येथील सरपंच पूजाताई सूर्यवंशी, उपसरपंच पूजाताई भंडारी या सहभागी होणार आहेत
दुपारी ३:३० ते ५ या वेळेतील चौथे सत्र ‘बाईपणाच्या कविता’ यामध्ये अनेक नामवंत कवयित्री सहभागी होणार आहेत. या सत्राच्या अध्यक्षा अंबेजोगाई येथील सुजाता भोजने असून, कवयित्री स्वाती पाटीत या सूत्रसंवादिका आहेत. विमलताई माळी, डॉ. स्वाती पाटील, अलका तालनकर-जोगी, अंजुमन शेख, विमल गाजरे-सुडके, मनीषा पाटील, नजमा शेख, विद्या जाधव, मनीषा मिसाळ, संगीता फसाटे, स्वाती ठुबे, स्वाती आहेर, सुरेखा घोलप,शामा मंडलिक, वर्षा भोईटे, सुजाता पुरी, सविता गोलेकर, शारदा ठेंबे, प्राजक्ता शिंदे, उज्वला जाधव, शारदा घोडके, स्वाती काळे, सोनाली रसाळ, सुनिता सटाले, उज्वला जाधव, संध्या साळवे, जयश्री सोनार, सारिका खराडे, उल्का केदारे, सुवर्णा पवार, शुभांगी सोनवणे, वंदना घोडके, जयश्री कांबळे, साक्षी जाधव, अवंती तनपुरे या महाराष्ट्रातील कवयित्री सहभागी होणार आहेत

सायं. ५ ते ६ या वेळेतील समारोपीय व पारितोषिक वितरण समारंभ सत्रात सामाजिक कार्यकर्त्या मनीषा दादासाहेब थोरात (आदर्श माता सन्मान), संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कल्याणीताई शंकरराव नेवसे (आदर्श सहधर्मचारिणी सन्मान), मे. बजरंगबली कन्स्ट्रक्शनच्या संचालिका अनुराधा विशाल गोडसे (आदर्श स्नुषा सन्मान), अष्टावधानी संतुलन फाउंडेशन पुणेच्या अध्यक्षा हेमलता भाऊसाहेब जंजिरे (आदर्श उद्योजिका सन्मान), कर्जत पंचायत समिती शिक्षण विस्तार-अधिकारी श्रीमती उज्ज्वला गायकवाड (आदर्श शिक्षणकार्य सन्मान), कार्याध्यक्षा प्रा. मीना खेतमाळीस यांना विशेष सन्मान सोहळ्यात अहिल्यानगरच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे आदिंच्या उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे. याशिवाय कर्जत तालुकास्तरीय शालेय निबंध, चित्रकला व वेशभूषा स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
संमेलनामध्ये सहभागी झालेल्या सर्व शिक्षिकांना चहा, अल्पोपहार, भोजन, माहिती किट व सहभाग प्रमाणपत्र नि:शुल्क पुरविले जाईल. या संमेलनामध्ये महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शाखेतील जास्तीत जास्त शिक्षिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन दादा पाटील महाविद्यालय, कर्जतचे प्राचार्य व संमेलनाचे प्रेषक डॉ. संजय नगरकर यांनी केले आहे.



