प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी किशोर कांबळे ; सचिवपदी प्रा. किरण जगताप


कर्जत येथील शासकीय विश्रामगृहात कर्जत तालुका प्रेस क्लबची वार्षिक बैठक रविवारी संपन्न झाली. मावळते अध्यक्ष प्रा. सोमनाथ गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीच्या सुरुवातीला मागील वर्षीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर, चालू वर्षाच्या नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी किशोरकुमार कांबळे, उपाध्यक्ष म्हणून विनायक चव्हाण तर सचिवपदी प्रा. किरण जगताप यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पुढील कार्यकारीणी अशी : कार्याध्यक्ष – भाऊसाहेब तोरडमल, खजिनदार- अस्लम पठाण, सहसचिव – संतोष रणदिवे, जिल्हा प्रतिनिधी – प्रा. सोमनाथ गोडसे, योगेश गांगर्डे, सन्माननीय सदस्य : मिलिंद राऊत, दादा शिंदे, कायदेशीर सल्लागार : ॲड. सचिन रेणुकर

या बैठकीत नूतन निवडीनंतर आगामी काळात राबवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक व विधायक उपक्रमांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार, येत्या जानेवारी महिन्यात प्रेस क्लबच्या वतीने भव्य पत्रकार संमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करणे, विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर कार्यशाळा आयोजित करणे, विधान भवनासह इतर ठिकाणी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करणे व इतर उपक्रम राबविण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.




